108 रुग्णवाहिकांवरील चालक खऱ्या अर्थाने "फ्रंटलाइन वॉरिअर' 

आनंद गायकवाड
Sunday, 15 November 2020

कोविडचा जागतिक प्रादुर्भाव सुरू झाल्याच्या काळात त्याविषयी काहीही माहिती नव्हती. अशा भीतिदायक वातावरणात रुग्णांच्या जवळ जाण्यास डॉक्‍टरही घाबरत होते.

संगमनेर (अहमदनगर) : कोविडचा जागतिक प्रादुर्भाव सुरू झाल्याच्या काळात त्याविषयी काहीही माहिती नव्हती. अशा भीतिदायक वातावरणात रुग्णांच्या जवळ जाण्यास डॉक्‍टरही घाबरत होते. मात्र, अशा कसोटीच्या काळात, आरंभापासून गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयापर्यंत पोचविणारे धैर्यशील वाहनचालक खऱ्या अर्थाने "फ्रंटलाइन वॉरिअर' असल्याचे गौरवोद्‌गार प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी काढले. 

आधार फाउंडेशनतर्फे आयोजित सामाजिक दिवाळीप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी "आधार'चे समन्वयक डॉ. महादेव अरगडे होते. ते म्हणाले, "आधार'ने 108 रुग्णवाहिकांच्या चालकांचा केलेला सन्मान यथोचित असून, प्रशासनाला सदोदित चांगले सहकार्य करणाऱ्या "आधार'चे कार्य समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांसाठी अत्यंत दिशादर्शक आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
"आधार'चे उपक्रम अतिशय स्तुत्य असून, सर्वांनाच प्रेरणादायी आहेत. संगमनेर व अकोले तालुक्‍यातील "108' रुग्णवाहिकाचालकांना "आधार'तर्फे मानपत्र, किराणा किट व दिवाळीची भेट म्हणून साडी देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोविड सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. समन्वयक अनिल कडलग, विठ्ठल कडुसकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी कोठवळ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आधार निवासी प्रकल्पासाठी प्रत्येकी अकरा हजार रुपयांची देणगी दिली, तसेच "आधार'ला मौलिक योगदान दिल्याबद्दल सुभाष पाराशर, सामाजिक युवा कार्यकर्ते आदित्य घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिभासंपन्न विद्यार्थिनी पूजा ढोकरट हिला भानुदास आभाळे यांनी नवीन मोबाईल भेट म्हणून दिला. "अक्षर भारती'तर्फे (पुणे) अध्यक्ष भानुदास आभाळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, संत गाडगेबाबा भानुप्रभाकार सेवा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष चं. का. देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक विठ्ठल कडुसकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल कडलग यांनी केले. सुखदेव इल्हे यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 108 ambulance drivers felicitated at Sangamner