नगर जिल्हा परिषदेत सेवा उपलब्धता व प्रतिनियुक्तीचा कर्मचाऱ्यांकडून गैरवापर

दौलत झावरे
Monday, 16 November 2020

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदलीप्रक्रिया दरवर्षी पारदर्शकपणे राबविण्याचा दावा केला जातो.

अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदलीप्रक्रिया दरवर्षी पारदर्शकपणे राबविण्याचा दावा केला जातो. मात्र, सेवाउपलब्धता व प्रतिनियुक्तीमुळे त्याला दरवर्षीच गालबोट लागते. या दोन्हींचा आधार घेत, काही जण हव्या त्या जागी परत बसून, स्वार्थ साधतात. हा सगळा खेळ शिफारशी व अधिकाऱ्यांसोबत असणाऱ्या जवळीकतेवरच चालतो. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी विनंती, प्रशासकीय व आपसी बदल्या होतात. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही प्रशासनाने ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरित्या बदलीप्रक्रिया राबवून राज्यात आदर्श निर्माण केला. बदलीप्रक्रियेनंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रतिनियुक्ती व सेवाउपलब्धतेसाठी काहींनी प्रशासनाकडे अर्ज केले. त्यात प्रतिनियुक्तीला विभागीय आयुक्तांची मंजुरी आवश्‍यक असल्याने, काहींनी सेवाउपलब्धतेचा आधार घेत इच्छित स्थळी नियुक्ती मिळविली. काहींनी नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले असून, शिफारशी मिळविल्या आहेत. हा प्रकार जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, त्याचे दुष्परिणाम इमानेइतबारे काम करणाऱ्यांवर होतो. 

हेही वाचा : शिर्डीतील साई मंदिर भाविकांसाठी खुले
कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे इतरांवर कामाचा ताण पडतो. प्रशासन काही कर्मचाऱ्यांची सेवाउपलब्धता करून तेथे वर्णी लावते. हे प्रशासनाच्या सोयीसाठी असले, तरी काहींनी त्याचा गैरफायदा घेत आपली जागा न सोडण्यासाठी त्याचा हत्यार म्हणून वापर सुरू केला आहे. त्यांच्या या वृत्तीमुळे त्यांच्या कामाचा भार इतरांना सहन करावा लागतो. प्रशासन त्याकडे डोळेझाक करते. 

मान्यवरांच्या शिफारशींवर हा प्रकार सुरू असला, तरी काही जण अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपल्या बदल्या करून घेत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. वर्ग "तीन' व वर्ग "चार' कर्मचाऱ्यांच्या काही बदल्या अशा पद्धतीने झाल्याची चर्चा आहे. 

यंदा 41 कर्मचाऱ्यांना नियुक्ती 
जिल्हा परिषदेत सत्ताबदल झाल्यानंतर सेवाउपलब्धतेचा आकडा नेहमीच बदलतो. 2019मध्ये वर्ग "तीन' कर्मचाऱ्यांच्या 27, तर वर्ग "चार' कर्मचाऱ्यांच्या 20, अशा एकूण 47 नियुक्‍त्या सेवाउपलब्धतेने देण्यात आल्या. 2020मध्ये वर्ग "तीन' संवर्गातील 20 कर्मचारी, तर 21 परिचरांना सेवाउपलब्धतेने नियुक्ती देण्यात आली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abuse of service availability and deputation by employees in Nagar Zilla Parishad