राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन

आनंद गायकवाड
Friday, 4 September 2020

कोरोना प्रादुर्भावाच्या काळातील लॉकडाऊनमुळे कित्येक कुटूंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संगमनेर (अहमदनगर) : कोरोना प्रादुर्भावाच्या काळातील लॉकडाऊनमुळे कित्येक कुटूंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राहुरीच्या कृषी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या महिनाभरापासून केलेल्या मागण्यांची प्रशासनाने दखल न घेतल्याने कुलगुरुंच्या दालनासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उत्तर नगर यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

देशभरात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यापासून लॉकडाउन घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे कित्येक कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राहुरीच्या महात्मा फुले विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन महिन्यापासून प्रशासनाकडे देवूनही त्यांची उत्तरे देण्यात आली नाहीत. या मागण्यात 2019 - 2020 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तत्काळ परत करावे. 

2020 - 2021 मधील महाविद्यालयाच्या एकूण शैक्षणिक शुल्कापैकी 30 टक्के शुल्क कपात करावे, शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणू नये तसेच शुल्क भरण्यासाठी किमान चार हप्त्यांची मुभा द्यावी. 24 मार्चपासून वसतीगृह बंद झाल्यामुळे, विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांना चार महिन्यांचे वसतिगृह शुल्क विद्यार्थ्यांना तत्काळ परत करण्याचे निर्देश द्यावेत या मागण्य़ांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करुन 10 दिवसांच्या कालावधीत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. पुणे येथे 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कुलगुरुंच्या बैठकीत या प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ यांनी विद्यार्थी आंदोलकांना दिले. मात्र मागण्या मान्य न झाल्यास अभाविप खुला मोर्चा काढणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 

वेळी पुणे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत, सचिन शितोळे ( नाशिक विभाग ) सुमीत जगदाळे ( सोलापूर विभाग ) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य कोमल राजपूत, सिद्धेश सोमाणी, रूद्रेश अंबाडे, संगमनेर तालुका प्रमुख शोण थोरात, अजिंक्य गुरावे, हंसराज बत्रा, प्रतिक पावडे, गौरव चांदर, आकाश जाधव, सचिन शेळके, विशाल बोर्डे, प्रफुल्ल खपके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ABVP Sit in agitation in front of the Vice Chancellor Hall of Rahuri Agricultural University