
Ahmednagar Crime News: नववधूसह नातेवाईकांची पैसे घेऊन धूम
राहुरी : लग्न जमल्यानंतर वाङ्दत्त वधूच्या नातेवाईकांनी दोन लाखांची मागणी केली. विवाहेच्छू तरुणानेही वेळोवेळी एक लाख ८५ हजार नातेवाईकांना दिले. थाटामाटात लग्नही लागले.
नातेवाईकांना घेऊन वधू सासरी आली. लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी मध्यरात्री पैशांसह वधू व नातेवाईकांनी धूम ठोकली. सात महिने होऊनही वधू न परतल्याने तरुणाने राहुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.
चंदू सीताराम थोरात (रा. ढवळपुरी, ता. पारनेर), भाऊसाहेब वाळुंज (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर), श्याम वाबळे (रा. वासुंदे, ता. पारनेर), अनिता रामचंद्र अग्रवाल (रा. बाळापूर आखाडा, ता. कळनोरी, हिंगोली), सुनील शरद कांबळे (रा. शिवाजीनगर, उस्मानाबाद), राहुल पाटील व सोनी शंकर पाटील (दोघेही रा. आनंदनगर, सारसी बडनेरा, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत.
एका विद्यापीठात कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून हा तरुण काम करत आहे. त्याच्या लग्नासाठी घरातील नातेवाईक मुलगी पाहात होते. एका नातेवाईकाने दूरध्वनीवरून ‘मुलगी पाहिली आहे. दोन लाख रुपये लागतील,’ असे सांगितले. (Latest Ahmednagar news)
तरुण आई-वडिलांसह पारनेर येथे गेला. तेथे त्यांना मुलगी हिंगोली येथील असल्याचे सांगण्यात आले. तीन जुलै २०२२ ला तरुण आई-वडील, नातेवाईकांसह कळनोरी (जि. हिंगोली) येथे मुलीच्या घरी गेले.
अनिता अग्रवाल यांच्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. एकमेकांची पसंती झाली. मात्र मुलीच्या नातेवाईकांनी दोन लाखांची मागणी केली. तरुणाने वेळोवेळी एक लाख ८५ हजार रुपये दिले. त्यानंतर ५ जुलै २०२२ ला सोनी शंकर पाटील (रा. आनंदनगर, अमरावती) हिच्याबरोबर त्याचा विवाह झाला.
तरुण वधूला घेऊन राहुरीत आला. ८ जुलै २०२२ला वधूचे नातेवाईक तमनर आखाडा येथे मुक्कामी आले. रात्री जेवण करुन सर्वजण एकाच खोलीत झोपले. मध्यरात्री एक वाजता नातेवाईकांसह वधू घरातून गायब झाल्याचे लक्षात आले.
दुसऱ्या दिवशी शोध सुरू झाला. मध्यस्थांनी दोन-तीन दिवसांत मुलीला तुमच्या घरी आणून घालू, असे सांगितले. परंतु, सहा महिने झाले. वधू परतलीच नाही. त्यामुळे या तरुणाने शुक्रवारी (ता. १७) राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.(Latest Marathi News)
मुलींची संख्या कमी झाल्याने असे प्रकार वाढले आहेत. मध्यस्थ दलाल गैरफायदा घेत आहेत. त्यांच्यापासून सावध राहावे. खात्री असल्याशिवाय असे व्यवहार व विवाह करू नयेत. शंका असल्यास स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
- मेघशाम डांगे, पोलिस निरीक्षक राहुरी