नगर काँग्रेसला लॉकडाउनमध्ये आली तरतरी, महापालिकेत केले लोकांसाठी आंदोलन

Ahmednagar City Congress agitation
Ahmednagar City Congress agitation

नगर : नगर शहरातील काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून मरगळ आली आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून तर ती कोमातच होती. मात्र, अलिकडेच किरण काळे यांची शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यापासून थोडी फार तरतरी आली आहे. लोकांच्या प्रश्नांवर आंदोलन करायला सुरूवात झाली आहे. काळे यांच्यासारखा लढवय्या तरूण काँग्रेसला मिळाल्याने पक्षाचे अस्तित्व दिसायला लागले आहे.

नगर शहरातील नागरीकांनी विविध आजारांसंबंधी उतरवलेला आरोग्य विमा रुग्णालयांकडून कॅशलेस सुविधेसाठी स्वीकारला जात नाही. या पार्श्वभूमीवर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा उपायुक्त प्रदीप पठारे यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केले. 

सध्या कोरोनाच्या महामारीचे संकट आहे. कोरोना बाधितांबरोबरच इतर आजारांसाठी रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागते. आयत्यावेळी सामोरे जावे लागणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठीच्या आर्थिक अडचणीवर उपाय म्हणून अनेक नागरिकांनी स्वतःचा आरोग्य विमा उतरविला आहे. हा विमा उतरवत असताना कॅशलेस सुविधा मिळावी म्हणून मोठ्या रकमेचा प्रीमियम रुग्णांनी विमा कंपन्यांना भरलेला असतो. 

परंतु सध्या शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना आणि इतर आजारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना आरोग्य विमा उतरविला असूनदेखील कॅशलेस विम्याची सेवा उपलब्ध करून दिली जात नाही. याउलट मोठ्या रकमेचे आगाऊ डीपॉझिट भरण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी कॉंग्रेस पक्षाकडे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांनी केल्या होत्या. 

याची दखल घेत शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळा समवेत उपायुक्त पठारे यांना याबाबत निवेदन देण्यासाठी गेले असता पठारे यांनी समाधानकारक चर्चा न केल्यामुळे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी संतप्त होत त्यांच्या दालनातच ठिय्या दिला. 

यावेळी संतप्त झालेल्या काळे यांनी पठारे यांना याबाबत जाब विचारत नगर शहरामध्ये कोरोनाच्या बाबतीमध्ये महानगर पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे कोलमडलेल्या व्यवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलन सुरु झाल्यानंतर थोड्या वेळाने पठारे नरमले. त्यांनी निवेदन स्वीकारत चर्चा करण्याची तयारी दर्शविल्याने आंदोलन थांबविण्यात आले. 

काळे यांनी पठारे यांच्या बरोबर चर्चा केली. यावेळी काळे यांनी महानगरपालिकेने नगर शहरातील रुग्णालयांना आरोग्य विमा असणाऱ्या नागरिकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचित करावे अशी मागणी केली. यावरती पठारे यांनी आयुक्तांशी आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती पावले तात्काळ उचलली जातील असे आश्वासन दिले. 

यावेळी झालेल्या या आंदोलनामध्ये शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष मयूर पाटोळे, विद्यार्थी कॉंग्रेस अध्यक्ष दानिश शेख, दीपक धाडगे, गणेश भोसले, डॉ. साहिल सादिक, योगेश काळे, सागर जाधव आदी सहभागी झाले होते. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com