esakal | प्रिस्क्रिप्शन व्हायरल ः बरे झालात आता झाड लावा, खूप ऑक्सिजन मिळेल

बोलून बातमी शोधा

Viral Pricription Images

प्रिस्क्रिप्शन व्हायरल : बरे झालात आता झाड लावा, खूप ऑक्सिजन मिळेल

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर ः सध्या कोविडच्या काळात ऑक्सिजनची काय आवश्यकता आहे, हे लोकांना कळायला लागलंय. उगाच त्याला प्राणवायू म्हणत नाहीत, हेही पटलंय. आपल्या जिल्ह्यात तयार होणारा ऑक्सिजन आपल्याच लोकांना मिळाला पाहिजे, अशी स्थानिक लोकांची मानसिकता बनतेय. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत, राज्यात अशी वैद्यकीय सुविधांअभावी आणीबाणी सुरू आहे.

सरकार आणि पर्यावरण प्रेमी झाडे लावण्याबाबत आपल्याला नेहमी सांगत असतात. परंतु त्याकडे केवळ गंमतीने पाहिलं गेलं. आता मात्र सर्वांचे डोळे खाडकन उघडले गेले आहेत. खासगी असो नाही तर सरकारी हे सर्वच वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर जिवाची बाजी लावून सुविधा देत आहेत. आपल्या परीने ते लोकांचे प्रबोधनही करीत आहेत. नगर तालुक्यातील वाळकी गावातील डॉक्टर दाम्पत्याने प्रिस्क्रिप्शनद्वारे दिलेला संदेश सोशल मीडियातून तुफान व्हायरल होतो आहे.

हेही वाचा: ह्रदयद्रावक ः दोन्ही मुले नाही आली, तहसीलदारांनीच दिला अग्निडाग

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर सर्वसाधारणपणे अमूक गोळी सकाळी,दुपारी घ्या. तमूक औषध जेवणानंतर घ्या अशा आशयाचा मजकूर असतो. परंतु नगरच्या डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शनने सर्वांचे खाडकन डोळे उघडले आहेत. असं अनोखं प्रिस्क्रिप्शन लिहिणाऱ्या डॉ. युवराज आणि कोमल कासार यांचे वाळकी गावात संजीवनी नावाचे हॉस्पिटल आहे. गेल्या वर्षीपासून तेथे त्यांनी कोविड सेंटरही सुरू केलंय. आतापर्यंत त्यांच्या कोविड सेंटरमधून पाचशेच्यावर रूग्ण बरे झाले आहेत. परिसरातील लोकांसाठी हे दाम्पत्य देवासमान ठरत आहे. कारण दूर शहरात बेड मिळत नाही. खर्चही परवडत नाही. त्यामुळे संजीवनी हॉस्पिटल खरोखरच परिसराला संजीवनी देत आहे.

डॉ. युवराज कासार सांगतात, लोकांचे आम्हाला खूप फोन येतात. ऑक्सिजन बेड मिळवून द्या, इंजेक्शनची काय व्यवस्था होईल का... प्रत्येक रूग्णांच्या नातेवाईकांचे अशाच आशयाचे फोन असतात. आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करतो. परंतु काही गोष्टी आमच्याही हातात नाहीत. पेशंट किंवा नातेवाईकांनी नियम पाळले तर ही वेळच येणार नाही. आमच्या कोविड सेंटरमधून डिस्चार्ज घेऊन जातात प्रत्येक पेशंट विचारतो, आता काय काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा: धडकी भरेल पण हे सत्य आहे, नगरमध्ये पंधरवड्यात ७२१ मृत्यू!

त्यांना आम्ही सांगतो, योग्य आहार घ्या. प्राणायाम, योगासने करा. मनशांती ठेवा. त्याबरोबर एक झाडही लावा म्हणजे हवा तेवढा ऑक्सिजन मिळेल, असे लिहिण्याची कल्पना सुचली. त्याचा खूप मोठा प्रभाव पडला आहे. लोकांचे खूप फोन येताहेत. प्रत्येकाने झाड लावले तर पर्यावरण चक्रही राखले जाईल, असे डॉ. कोमल कासार यांनी सांगितलं.

असं आहे प्रिस्क्रिप्शन

आजारातून बरा झाल्यानंतर एक झाड लावा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन कमी पडणार नाही, असा तो संदेश आहे. महाराष्ट्रातील सर्वच माध्यमातून हे प्रिस्क्रिप्शन व्हायरल होते आहे. प्रत्येक रूग्णासाठी प्रिस्क्रिप्शनवर हाताने संदेश लिहिण्यासाठी मोठा वेळ जात होता, त्यामुळे आता आम्ही स्टॅम्प बनवून घेतला आहे.

-डॉ. युवराज कासार, संजीवनी हॉस्पिटल. वाळकी.