अहमदनगर महापालिकेचा मोठा निर्णय; रस्त्यावर पाणी फेकणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील विविध मुख्य रस्त्यांची दुरुस्ती, पॅचिंग, तसेच अनेक ठिकाणी नवीन डांबरी रस्त्यांची कामे सुरू आहेत.

अहमदनगर : महापालिका हद्दीत डांबरीकरण केलेला रस्ता, तसेच पॅचिंग करण्यात आलेल्या जागेवर पाणी टाकल्यास आता संबंधित नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या संदर्भातील पत्रकच महापालिकेने प्रसिद्धीस दिले आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील विविध मुख्य रस्त्यांची दुरुस्ती, पॅचिंग, तसेच अनेक ठिकाणी नवीन डांबरी रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे करण्यापूर्वी, कामे सुरु असताना व पूर्ण झाल्यानंतर वेळोवेळी भेटी दिल्या असता असे निदर्शनास येते, की नागरिक त्यांच्या निवासी व व्यावसायिक जागा स्वच्छ केल्यानंतर ते पाणी थेट रस्त्यावर निष्काळजीपणे सोडतात. रस्त्यावर पॅचिंग करताना डांबर, खडी टाकून रोलिंग केल्यानंतर काही तासांतच नागरिक कुठलाही विचार न करता पाणी सोडतात. 

हे ही वाचा : पंचायत समितीच्या आवारात कचऱ्याचे ढीग; स्वच्छतेच्या संदेशाला तिलांजली, अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष

पाणी व डांबर यांचे तांत्रिकदृष्ट्या वितुष्ट आहे. नवीन डांबरीकरणाच्या पायामध्ये पाणी गेल्यास खडी रस्ता सोडून देते व केलेले रस्ते उखडतात. त्यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होतो. नागरिकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या रोषास प्रशासनाला सामोरे जावे लागते. सद्यःस्थितीत सुरू असलेल्या कामांमध्ये वरील बाबी आढळून आल्यामुळे, गुलमोहर रस्ता, गावठाण परिसरातील नागरिकांना नोटिसा दिल्या आहेत. रस्त्यावर पाणी सोडणाऱ्या नागरिकांवर फौजदारी आता गुन्हे दाखल करण्यात येतील, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ahmednagar the Municipal Corporation has issued a statement saying that a case will be filed against those who throw water on the road