Ahmednagar News : मनपाला हवे तीनशे कोटींचे कर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipality wants loan of three hundred crores budget of 1240 crores presented Emphasis income growth

Ahmednagar News : मनपाला हवे तीनशे कोटींचे कर्ज

अहमदनगर : महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी आज तब्बल एक हजार २४० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांना सादर केले. अंदाजपत्रकात ३०० कोटी रुपयांची कर्जरूपी रक्कम गृहीत धरण्यात आली आहे. शहरातील विकासकामांसाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे.

स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, डॉ. श्रीनिवास कुरे, मुख्य लेखाधिकारी शैलेश मोरे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, लेखा विभागाचे अनिल लोंढे आदींसह स्थायी समिती सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.

आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, की शहरात चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करण्यासाठी तसेच रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुलभूत आरोग्य, विज, पाणी या चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यासाठी महापालिका कटिबध्द आहे.

मुलभूत सुविधा विकास योजना, दलितेतर वस्ती सुधारणा योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, अल्पसंख्यांक विकास निधी, १५ वा वित्त आयोग, सर्वांसाठी घरे, पाणी पुरवठा निधीसाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे. शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करुन घरपट्टी आकारणी करुन उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे महापालिकेच्या मालकीच्या जागांचा विकास करुन त्या माध्यमातून महसूल वाढविण्यात येईल. शहरातील अपूर्ण अवस्थेतील योजना व विकास कामे लवकर पूर्ण करू, असे आयुक्त डॉ. जावळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सभापती कवडे यांनी अंदाजपत्रकाचा अभ्‍यास करण्यासाठी सभा तहकूब केली.

८१८ कोटी होणार जमा

महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी ८० कोटी ८० लाख, संकलीत करावर आधारीत करापोटी ७९ कोटी ७० लाख, जीएसटी अनुदान १२० कोटी ६० लाख व इतर महसुली अनुदान १७ कोटी ८५ लाख, गाळा भाडे ३ कोटी ६० लाख, पाणीपट्टी ४२ कोटी ६१ लाख, मिटरद्वारे पाणी पुरवठापोटी २० कोटी, संकीर्णे ४२ कोटी ३९ लाख, तसेच भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरुन ८१८ कोटी ३७ लाख अंदाजित जमा होणार आहेत.

राष्ट्रीयकृत बँकांकडून घेणार कर्ज

शहरात भूयारी गटार योजना, तसेच इतर कामांचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. वेगवेगळ्या विकासकामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणार असून, त्यासाठी महापालिकेला स्वःहिस्साची रक्कम भरावी लागणार आहे. त्यासाठी महापालिका सुमारे ३०० कोटी रूपयांचे कर्ज काढणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून गरज लागेल त्याप्रमाणात टप्प्याने हे कर्ज घेण्यात येणार आहे.

असे आहे अंदाजपत्रक

  • महसुली उत्पन्न ४३२ कोटी २१ लाख

  • भांडवली जमा ७४० कोटी ०५ लाख

  • भत्ते व मानधनावर १३८ कोटी खर्च

आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सादर केलेले एक हजार २४० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सर्वसमावेशक आहे. शहरातील विकासकामांना गती मिळेल, यासाठी मोठ्या निधीची तरतूद अंदाजपत्रकात आहे. स्थायी समितीच्या सभेत अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. सर्व सदस्य मिळून अंदाजपत्रकात आवश्यक त्या दुरुस्त्या सुचविणार आहोत.

- गणेश कवडे, सभापती, स्थायी समिती