
यासाठी सर्वसाधारणपणे दहावी उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण आणि एकवीस वर्षे वय पूर्ण असलेल्या कोणत्याही उमेदवाराला भरती होण्याची संधी आहे.
कर्जत : ""येथील दादा पाटील महाविद्यालयातील संरक्षण व एनसीसी विभागाने ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी नवी दिल्ली येथील सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. या कंपनीअंतर्गत दादा पाटील महाविद्यालयात परिसर मुलाखती होणार आहेत,'' अशी माहिती प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी दिली.
या सामंजस्य करारासाठी एनसीसी विभागप्रमुख मेजर संजय चौधरी यांनी पुढाकार घेतला. यापूर्वी या महाविद्यालयाने पाचशे सुरक्षारक्षकांची भरती केली होती.
1974मध्ये स्थापन झालेली आशियातील ही सर्वांत मोठी कंपनी असून, तिचे कायमस्वरूपी दोन लाख अधिकारी- कर्मचारी आहेत. भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया व अन्य देशांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. पंतप्रधान कौशल्यविकास योजनेंतर्गत कंपनीत भरती केली जाते. मनुष्यबळ विकास विभागाच्या नियमानुसार सुविधा, दहा वर्षे सेवा केल्यास कायमस्वरूपी पेन्शन व सर्व सुविधा नियमानुसार दिल्या जातात.
यासाठी सर्वसाधारणपणे दहावी उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण आणि एकवीस वर्षे वय पूर्ण असलेल्या कोणत्याही उमेदवाराला भरती होण्याची संधी आहे. याचा फायदा गरजूंनी घ्यावा. येत्या 18 नोव्हेंबरपासून दहा ते तीन या वेळेत महाविद्यालयामध्ये भरती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य कांबळे यांनी दिली.
या उपक्रमासाठी संजय चौधरी, प्रा. किसन सूळ यांचे सहकार्य लाभले. आमदार रोहित पवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
संपादन - अशोक निंबाळकर