अहमदनगर : एसटीच्या दारी खासगीची सवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

अहमदनगर : एसटीच्या दारी खासगीची सवारी

अहमदनगर (शेवगाव) : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी नऊ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. बससेवा बंद असल्याने बसस्थानकावरून खासगी प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र या चालकांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. शेवगाव आगारातील २६० कर्मचारी या आंदोलनात सहभागी असल्याने येथील बससेवा गेल्या नऊ दिवसांपासून बंद आहे. या दरम्यान आव्हाणे खुर्द येथील चालक दिलीप काकडे यांनी आगारातील उभ्या असलेल्या बसला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे आंदोलन चिघळले.

ऐन सणाच्या काळात कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. शेवगाव आगारातून पैठण, गेवराई, पाथर्डी, नेवासे, नगर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी बस जातात. लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबरच इतर आगारांतून येणाऱ्या बसही बंद आहेत. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक जोरात सुरू आहे. राज्य शासनाने देखील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पर्याय म्हणून बसस्थानकातून खासगी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

हेही वाचा: Corona Update : राज्यात नवे 886 रुग्ण; मृत्युसंख्येत किंचित वाढ

सात कर्मचारी निलंबीत

संपात सहभागी असलेल्या शेवगाव आगारातील कर्मचाऱ्यांपैकी एक चालक, एक वाहन परीक्षक व पाच वाहकांना निलंबीत करण्यात आले आहे. बसस्थानक व आगार परिसरात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने त्यांनी नेवासे रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात आंदोलन सुरू केले आहे.

loading image
go to top