Ahmednagar : वाहने ३ लाख, पोलीस फक्त ४५; अवजड वाहतुकीने डोकेदुखी वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar

Ahmednagar : वाहने ३ लाख, पोलीस फक्त ४५; अवजड वाहतुकीने डोकेदुखी वाढली

अहमदनगर : शहरातील सुमारे तीन लाख वाहनांचे नियमन करण्यासाठी अवघे ४५ वाहतूक पोलिस आहेत. त्यात पार्किंगसारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने पाठ फिरवलेली आहे. परिणामी, शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

नगर शहराच्या हद्दीतून गेलेल्या सात महामार्गांवरून रोज हजारो वाहने ये-जा करतात. त्यात जिल्ह्यात सुमारे १५ लाख वाहनांची नोंद असून, एकट्या नगर शहरात तीन लाख वाहने आहेत. त्यामुळे नगर शहराला मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा भार सहन करावा लागत आहे. मात्र, या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे आजारपण, लग्नकार्य, वाढदिवस अशा कारणांसाठीदेखील वाहतूक पोलिसांना रजा मिळत नाही.

वाहनांची संख्या ज्या पटीत वाढत आहे, त्या तुलनेत शहर वाहतूक नियंत्रण शाखा सक्षम करणे आवश्यक आहे. मात्र, पोलिस प्रशासनाने मागील अनेक वर्षांपासून या शाखेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शहरातील वाहतुकीचे नियमन होण्याऐवजी वाहनचालकांची मनमानी सुरू असल्याचे चित्र सध्या नगरमध्ये दिसून येते. कोठला मार्केट यार्ड चौक, सक्कर चौक, माळीवाडा बसस्थानक, दिल्लीगेट, अमरधाम, कापडबाजार, टिळक रोड, सर्जेपुरा, बोल्हेगाव फाटा या प्रमुख ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झालेली आहे.

बोलिलों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥

वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥

जो योग्य मार्ग दाखवितो तो काही अधिक बोलला तर त्याच्यावर रुसू नये, नाहीतर आपलेच नुकसान होते, असे तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटले आहे. पोलिसांनी सांगितलेले वाहतुकीचे नियम न पाळल्यास आपलेच नुकसान होते हे वाहनचालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • वाहतूक नियमांची पायमल्ली

  • सिग्नल यंत्रणा नियमित सुरू नसते.

  • पी- वन, पी- टू तारखेनुसार पार्किंग नाही.

  • अंतर्गत रस्त्यावर वन- वे ची अंमलबजावणी नाही.

  • नो- पार्किंग झोनचे फलक नावापुरतेच

  • अवजड वाहतुकीला अभय

  • नियम पाळणे गरजेचे

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून लाखो रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करणे, एवढेच वाहतूक पोलिसांचे काम आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दुचाकीवर सुसाट सुटणारे अल्पवयीन मुले- मुली, अवजड वाहने, रिक्षाचालक सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात.