शिर्डी विमानतळ सुरू; दिल्लीसाठी दिवसाआड सेवा, ५ डिसेंबरपासून अन्यत्र सुरू होणार

सतिश वैजापूरकर
Saturday, 28 November 2020

साईमंदिर खुले झाले, तसे दाक्षिणात्य भाविकांकडून विमान कंपन्यांकडे विचारणा सुरू झाली.

शिर्डी (अहमदनगर) : साईमंदिर खुले झाले, तसे दाक्षिणात्य भाविकांकडून विमान कंपन्यांकडे विचारणा सुरू झाली. कोविडचा प्रकोप सुरू असला, तरी किमान निम्म्या आसन क्षमतेएवढे प्रवासी मिळतील, असे विमान कंपन्यांनी गृहित धरले. त्यानुसार येत्या पाच डिसेंबरपासून नियमित सेवा सुरू करण्याचे जाहीर केले. तोपर्यंत इंडिगो कंपनीने दिल्लीसाठी दिवसाआड सेवा सुरू केली. 

हेही वाचा : संगमनेर तालुक्याने ओलांडला पाच हजारांचा टप्पा; ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढले
खबरदारीचा उपाय म्हणून कोविड चाचणी न करता, आलेल्या प्रवाशांसाठी विमानतळावर अँटीजेन चाचणीची सुविधा सरकारी यंत्रणेने उपलब्ध करून दिली आहे. 

कोविडच्या छायेत विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन इंडिगो व स्पाईसजेट, या दोन्ही कंपन्यांनी केले. येत्या पाच डिसेंबरपासून स्पाईसजेट दिल्ली, हैदराबाद व बंगळुरू या तीन महानगरांसाठी सेवा सुरू करणार आहे. आसनक्षमतेच्या निम्मे प्रवासी मिळाले, तरी किमान "ना नफा-ना तोटा' या तत्त्वावर सेवा सुरू ठेवण्याचा हिशेब त्यामागे आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
इंडिगो कंपनीची 212 आसनी एअरबस येथे आली. तीत दिल्लीहून 98 प्रवासी आले. त्यातील 18 प्रवासी कोविड चाचणी न करता आल्याने, त्यांची येथील विमानतळावर अँटी जेन चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना बाहेर सोडण्यात आले. स्पाईस जेट 90 आसनी विमानसेवा सुरू करणार आहे. साईमंदिरातील दर्शनव्यवस्था बऱ्यापैकी सुरळीत झाली. दर्शनाचे ऑनलाइन बुकिंग करून दाक्षिणात्य व दिल्लीतील भाविक विमानाने शिर्डीत येत आहेत. कोविड नियंत्रणात आणि दर्शनव्यवस्था अशीच सुरळीत राहिल्यास विमानसेवादेखील सुरू राहील. 

कार्गो सेवाही सुरू होणार 
येत्या 5 डिसेंबरपासून शिर्डीसाठी एकाच वेळी दिल्ली, हैदराबाद व बंगळुरूसाठी हवाईसेवा सुरू करण्याची तयारी स्पाईस जेट कंपनीने केली आहे. प्रवासी वाहतुकीसह कार्गो सेवाही सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी दोन व्यापाऱ्यांनी माल पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The airport in Shirdi has started