जिल्हा परिषदेतील सगळ्याच कर्मचाऱ्यांची होणार कोरोना टेस्ट

दौलत झावरे
Friday, 7 August 2020

जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांमधील अनेक कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी राहत नाहीत. अनेक जण बाहेरगावांहून ये-जा करतात. त्यांतील काही कर्मचारी आता कोरोनाबाधित होत असून, अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सध्या कार्यालयांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. 

नगर ः जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यावर या विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. या धर्तीवर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. तसा पत्रव्यवहार जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केला आहे. 

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह अधिकारी- कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करावी, अशी मागणी महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे यांनी केली होती. त्यापाठोपाठ जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेनेही ही मागणी केली. त्याचा विचार करून जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान,पारनेर पंचायत समितीमधील ५९ कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

हेही वाचा - दौड-मनमाड रेल्वे मार्गाावर ४० मेंढ्या ठार

या बाबत जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की जिल्हा परिषदेत सुमारे 450 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांतील काही कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यामुळे इतर कर्मचारी धास्तावले आहेत. 

जिल्हा परिषद प्रशासनाने सध्या सर्व कर्मचाऱ्यांना "वर्क फ्रॉम होम'चे आदेश दिले आहेत; परंतु त्यातही कामकाजात अडचणी येत असून, नागरिकांना वेळेवर सुविधा देणे शक्‍य होत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अधिकारी- कर्मचाऱ्यांची कोरोनाबाबत रॅपिड टेस्ट करणे आवश्‍यक आहे.

जे कर्मचारी बाधित आढळून येतील, त्यांचे तत्काळ विलगीकरण करून योग्य उपचार घेता येतील, जेणे करून कार्यालयातील इतर कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयदेखील सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्याची अपेक्षा पत्रात नमूद केली आहे. 

 
कर्मचारी घेतात पर्यटनाचा आनंद 
जिल्हा परिषदेत कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कामकाज बंद ठेवून "वर्क फॉर्म होम'चा आदेश दिला आहे. मात्र, काही जण गैरफायदा घेत देवदर्शनासह पर्यटनस्थळांना भेटी देऊन आनंद लुटत आहेत. त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला. त्यामुळे प्रशासनाच्या मूळ हेतूला तिलांजली मिळाल्याचे दिसते. 

अप-डाउनमुळे धोका वाढला 
जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांमधील अनेक कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी राहत नाहीत. अनेक जण बाहेरगावांहून ये-जा करतात. त्यांतील काही कर्मचारी आता कोरोनाबाधित होत असून, अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सध्या कार्यालयांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. 

जिल्हा परिषदेत आतापर्यंत 16 बाधित 
जिल्हा परिषदेतील कोरोनाबाधितांची संख्या 16 झाली आहे. त्यांत तीन अधिकारी व 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांतील एक अधिकारी व एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. नगरच्या पंचायत समितीत आतापर्यंत एकूण तिघे पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या रॅपिड टेस्टसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्यामार्फत जिल्हा रुग्णालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. 
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Zilla Parishad employees will undergo corona test