लॉकडाउनमुळे कळले लोकांचे गुण 

दत्ता इंगळे
Monday, 8 June 2020

लॉकडाउनमुळे कोणालाच घराबाहेर जाता येत नसल्याने मानसिक दडपण आल्यासारखे वाटत होते. त्यातून मित्र, आप्तेष्टांना बाहेर काढण्यासाठी काहींनी विनोद, विडंबनात्मक संदेश सोशलच्या माध्यमातून व्हायरल केले.

नगर तालुका ः कोरोनामुळे लॉकडाउन केल्याने सुमारे दोन महिन्यांपासून अनेक जण घरातच आहेत. मिळालेल्या या वेळेचे अनेकांनी सोने केले. आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव दिला. या कलागुणांचे प्रदर्शन सोशल माध्यमातून केले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

हेही वाचा ः लॉकडाउन ः ऑनलाईन स्पर्धेत भाग घेताय...सावधान, तुमच्यासोबत होऊ शकतो हा धोका 

इच्छा असूनही रोजच्या कामकाजाच्या धावपळीमुळे अनेकांना गायन, अभिनय, नृत्य, चित्रकला, पाककला आदी सुप्त गुणांना वाव देता येत नव्हता. मात्र, लॉकडाउनमुळे ही संधी मिळाली. त्याचे सोने करीत अनेकांनी कला-गुणांना वाट मोकळी करून दिली.

कुटुंबातील कर्त्या व्यक्तींमध्ये इतक्‍या चांगल्या कला असल्याचा बोध सर्वांना झाला. कलागुणांचे प्रदर्शन घरानंतर अनेकांनी सोशल माध्यमातून समाजासमोर मांडले. त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात गावागावांत, तसेच कार्यालयांमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांत आपल्यातील कलाकारांना संधी देण्याचा मानस अनेकांनी व्यक्त केला.

 अवश्य वाचा ः "कोरोना'चा मराठी शाळांना हा होणार फायदा, मास्तरांची थांबणार वणवण 

लॉकडाउनमुळे कोणालाच घराबाहेर जाता येत नसल्याने मानसिक दडपण आल्यासारखे वाटत होते. त्यातून मित्र, आप्तेष्टांना बाहेर काढण्यासाठी काहींनी विनोद, विडंबनात्मक संदेश सोशलच्या माध्यमातून व्हायरल केले. त्यामुळे अनेकांच्या मनावरील दडपण कमी होऊ शकले. त्याचा चांगला परिणाम समाजमनावर झाल्याच्या प्रतिक्रिया काहींनी सोशल माध्यमातून व्यक्त केल्या. 

घरातील व्यक्तींना हॉटेलमधील पदार्थ नेहमीच आवडत. मात्र, लॉकडाउनमुळे अनेक जण मोबाईलवर पाहून पाककला शिकले. आता ते घरातच विविध खाद्यपदार्थ बनवीत आहेत. 
- दीपाली दातरंगे, गृहिणी, नगर 

निसर्गाने प्रत्येकालाच हा झटका दिला आहे. त्यातून अनेकांना घरातील अडचणी समजल्या. आपणही गृहिणींना मदत केली पाहिजे, हे समजले. एकमेकांमध्ये सामाईक अंतर राखण्याचे महत्त्वही समजले. अनेकांना कलागुणांना वाव देता आला. जुन्या चालीरीतींचे महत्त्व समजले. आता जुन्याच चालीरीती प्रत्येक जण अनुकरणात आणत आहेत. 
- सदानंद भणगे, साहित्यिक  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Art exposed in lockdown