esakal | मंदिर बंद उघडले बार, उध्दवा धुंद तुझे सरकार; शिर्डीत भाजपचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

BJP's agitation for temple in Shirdi

मंदिर बंद- उघडले बार, उध्दवा धुंद तुझे सरकार अशी घोषणा देत आज, राज्यातील मंदिर खुले करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्या पुढाकारातून ठिकठीकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

मंदिर बंद उघडले बार, उध्दवा धुंद तुझे सरकार; शिर्डीत भाजपचे आंदोलन

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी ः राज्यातील मंदिरे का खुली होत नाहीत. अशी विचारणा करणा-या राज्यपालांना उद्देशून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणतात, मला हिंदूत्व शिकवू नका. प्रत्यक्षात आपल्या घरातील शिवसेना प्रमुखांच्या तसबिरी खालील ओळीतील हिंदूह्रदय सम्राट हा शब्द काढून टाकतात.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारी पुस्तिका काँग्रेस पक्ष प्रकाशित करतो. हे मूग गिळून बसतात. तुम्ही हिंदूत्ववादी आहात की नाही हे निवडणुक आली की जनता ठरवील. साधु-संत राज्यभरात उपोषणाला बसलेत त्याची दखल घ्या. मंदिरे खुली करा. अन्यथा संतावर मंदिरांचे दरवाजे उघडण्याचे आंदोलन करण्याची वेळ येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला. 

मंदिर बंद- उघडले बार, उध्दवा धुंद तुझे सरकार अशी घोषणा देत आज, राज्यातील मंदिर खुले करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्या पुढाकारातून ठिकठीकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

शिर्डीत या आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, नाशिक येथील काळाराम मंदिराचे महंत सुधिरदास, प्रकाश जावंजळ महाराज, भाऊ महाराज फुरसूंगीकर, सुदर्शन महाराज यांच्यासह दिंडोरीच्या खासदार भारती पवार, पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष अर्चना कोते, साईसंस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरसेवक शिवाजी गोंदकर, सचिन शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी तसेच काही व्यावसाईक सहभागी झाले होते. या आंदोलनास पाठींबा देताना पाटील बोलत होते.

ते म्हणाले, मदिरालय, एसटीबस आणि विमान प्रवास केल्याने कोरोना होत नाही. मग मंदिरात दर्शन घेतल्याने तो कसा होईल हे कळत नाही. हे मुके बहिरे आणि आंधळे राज्य सरकार आहे. यांना घंटानाद ऐकू आला नाही. शेतक-यांचे नुकसान दिसत नाही. संत महंतांची मागणी ऐकू येत नाही. माऊलीच्या पादुका न्यायला यांना हेलीकॅप्टर मिळत नाही. राज्यातील सर्व धर्मियांना प्रार्थनास्थळे उघडावीत असे वाटते. राज्य सरकारला मात्र त्याचे काही वाटत नाही.

आचार्य तुषार भोसले म्हणाले, दोन्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हिंदूत्व विसरले. त्यांनी सत्तेचा गड सर केला आणि हिंदूत्वाचा सिंह हरवून बसले. त्यामुळे मंदिरे उघडणे त्यांना महत्वाचे वाटत नाही. मंदिर बंद असल्याने ठिकठीकाणचे अर्थकारण धोक्यात आले. त्यांना आता सरकारने पॅकेज जाहीर करावे.

संपादन - अशोक निंबाळकर