esakal | पुन्हा सावित्री पुलासारखी दुर्घटना होण्याची शक्यता; ढोरा नदीवरील पुल धोकादायक
sakal

बोलून बातमी शोधा

The bridge over Dhora river on Shevgaon Newase road is dangerous

शेवगाव- नेवासे या तालुक्यासह नगर जिल्हयाला मराठवाडयाशी जोडणाऱ्या शेवगाव-  नेवासे रस्त्यावरील ढोरा नदीच्या पुलाचे कठडे तुटल्याने वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.

पुन्हा सावित्री पुलासारखी दुर्घटना होण्याची शक्यता; ढोरा नदीवरील पुल धोकादायक

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव- नेवासे या तालुक्यासह नगर जिल्हयाला मराठवाडयाशी जोडणाऱ्या शेवगाव-  नेवासे रस्त्यावरील ढोरा नदीच्या पुलाचे कठडे तुटल्याने वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे नदी पात्रात जायकवाडी धरणाचा जलफुगवटा असल्याने या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होय.

शेवगाव- नेवासे या प्रमुख राज्यमार्गावरील ढोरा नदीवर २.५ मीटर लांबीचे सहा गाळे असलेल्या पूलाचे बांधकाम १९७६ मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक मोठया प्रमाणावर वाढली. त्यानंतर पुलाचे संरक्षक कठडे पूर्णत: तुटले असून दोन्ही बाजूने हा पूल वाहतूकीसाठी धोकादायक बनला आहे. जायकवाडी धरणाचे फुगवटयाचे पाणी वर्षभर पुलाखाली साचलेले असते. त्याची खोली दहा फुटापेक्षाही जास्त असल्याने व पात्रात मोठया प्रमाणावर गाळ असल्याने पुलावरुन होणारी वाहतूक अधिक जिकीरीची झाली आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोकणातील महाडजवळील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर राज्य सरकारने राज्यातील सर्वच पुलाचे स्ट्रक्चरल आँडीट करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या होत्या. त्यानंतरही या पुलाकडे बांधकाम विभागाचे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने दोन्ही सिमेंटचे बाजूचे कठडे तुटून पडले आहेत. ४६ वर्षानंतर कठडयांची अवस्था अतिशय जीर्ण झाली असून ते सहजासहजी गळून पडत आहेत. कठडयाइतकीच दुरवस्था पुलाचीही झालेली असतांना त्यावरील जड वाहतुक, प्रवाशी वाहतुक सुरु ठेवणे धोकादायक आहे. शिवाय नदीला पाणी असल्याने वाहतूकीसाठी पर्यायी रस्ता ही उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत या धोकादायक पुलाच्या दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे. 

हेही वाचा : पोलिस निरीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे २१ जणांचे जीव धोक्यात
शेवगाव शहरातील गणेश विसर्जन या नदीच्या पात्रात या पुलावरुनच करण्यात येत असल्याने समभाव्य गर्दी व त्यानुषंगाने होणारा धोका याचा विचार करणे गरजेचे आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे म्हणाले, पुलाची अत्यंत दुरवस्था झालेली असतांना त्यावरील वाहतुकीचा ताण लक्षात घेता मोठी दुर्घटना घडू शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत गांभीर्याने घेण्याची गरज असून पुलाच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने करण्याची गरज आहे.

शेवगाव सार्वजनिक बाधकाम विभागाचे शाखा अभियंत्रा ए. आ. कोंगे म्हणाले, पुलाच्या कठडयाच्या दुरुस्तीच्या कामासाठी दोन वर्षापासून प्रस्ताव मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलेला आहे. मात्र शेवगाव- नेवासे रस्त्याचे रुंदीकरणाचे काम करण्याचे प्रस्तावित असल्याने त्यात नवीन पुलाच्या बांधकामाचा समावेश असल्याने पुलाच्या दुरस्ती प्रस्तावास मंजूरी मिळालेली नाही.

संपादन : अशोक मुरुमकर