पाथर्डीत शेतकऱ्यांची लूटमार, आधारभूत किंमतीपेक्षाही कमी दराने खरेदी

राजेंद्र सावंत
Saturday, 2 January 2021

"नाफेड'चे शासकिय तूर खरेदीकेंद्र अद्याप सुरू झाले नाही. शेतकऱ्यांची लूट थांबावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. तालुक्‍यात या वर्षी सुमारे साडेआठ हजार हेक्‍टर क्षेत्रावर तुरीची लागवड व पेरणी करण्यात आली होती.

पाथर्डी ः तालुक्‍यात यावर्षी साडेआठ हजार हेक्‍टर तुरीची लागवड करण्यात आली होती. कपाशीचे पिक वाया गेले, मात्र तुरीने आधार दिला. एक लाख क्विंटल तुरीचे विक्रमी उत्पादन तालुक्‍यात झाले आहे. केंद्र सरकारची आधारभूत किंमत सहा हजार रुपये क्विंटल आहे.

पाच हजार ते पाचहजार दोनशे रुपये क्विंटलने तूर खरेदी करुन व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही लूट सुरू आहे. 

हेही वाचा - डॉ. सुजय विखे पाटलांनी दिली ७२ तासांची मुदत

"नाफेड'चे शासकिय तूर खरेदीकेंद्र अद्याप सुरू झाले नाही. शेतकऱ्यांची लूट थांबावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. तालुक्‍यात या वर्षी सुमारे साडेआठ हजार हेक्‍टर क्षेत्रावर तुरीची लागवड व पेरणी करण्यात आली होती. कपाशीला पर्याय म्हणून शेतकरी तुरीच्या पिकाकडे वळले आहे. सुमारे एक लाख क्विंटल तुरीचे उत्पादन तालुक्‍यात झाले असल्याचे तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर यांनी सांगितले. 

तूरविक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी 28 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. सध्या शेतकरी तूर विक्रीला घेवून आला, तर व्यापारी पाच हजार ते पाचहजार दोनशे रुपये क्विंटलने खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांची लूट सुरू असताना कारवाई होत नाही. जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांना हे अधिकार असले, तरी त्याचा वापर होत नाही. 

 

केंद्र सरकारच्या तूर खरेदी केंद्राला परवानगी मिळाली आहे. जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्थेला केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. शेतऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. आतापर्यंत केवळ पन्नास ते साठ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सहा हजाराचा भाव सरकारने जाहीर केला आहे. 
- संजय पालवे, अध्यक्ष, जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था, पाथर्डी 

व्यापाऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने तूर खरेदी करू नये. सरकारी नियमांची ही पायमल्ली आहे. आम्ही कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या विरुद्ध तक्रारी केल्या आहेत. जिल्हा मार्केटींग अधिकारी व बाजार समित्यांकडे तक्रारी करुन कारवाई झाली नाही, तर शेतकरी रस्त्यावर उतरेल 
- शरद मरकड, अध्यक्ष शेतकरी संघटना, पाथर्डी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buy at a lower rate than the base price in Pathardi