
शासकीय धोरणाप्रमाणे ग्रामपंचायत उमेदवारांचा एकत्रित अंतिम खर्च घेताना त्यांचे शपथपत्र (घोषणापत्र) सध्या कागदावर घेणे गरजेचे आहे.
श्रीगोंदे (अहमदनगर) : जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यासाठी जिल्ह्यातील 23 हजार 818 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या सर्वांना दैनंदिन निवडणूक खर्च व अंतिम एकत्रित निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे. अंतिम खर्च घेताना १०० रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र घेण्याचा प्रयत्न काही शासकीय अधिकारी करीत आहेत. हा प्रकार शासनाच्या धोरणाविरोधात असून, जिल्ह्यातील उमेदवारांना 23 लाख 81 हजार 800 रुपयांचा यामुळे भुर्दंड बसणार असल्याचे श्रीगोंदे तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी सांगितले.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
प्रा. दरेकर म्हणाले, शासनाने महसूल व वन विभागाकडील अधिसूचना जुलै-2004 अन्वये, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासाठी, तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांच्यासमोर दाखल करायच्या अन्य सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवर आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केले आहे. या कामाकरिता मुद्रांक (स्टॅम्प पेपर) विकत घेण्याची गरज नसल्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, सरकार यांनीही जाहीर केले आहे.
हे ही वाचा : लग्नासाठी सुंदर मुलीचं स्थळ चालून आलंय काय; औरंगाबाद, कोल्हापूर, अकोला, बुलडाण्याच्या तरूणींनी काय केलं पहा
शासकीय धोरणाप्रमाणे ग्रामपंचायत उमेदवारांचा एकत्रित अंतिम खर्च घेताना त्यांचे शपथपत्र (घोषणापत्र) सध्या कागदावर घेणे गरजेचे आहे. त्यासाठी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही. मात्र, शासकीय धोरणांचा अभ्यास न करणारे अधिकारी विनाकारण लाखो रुपयांचे स्टॅम पेपर घेण्यास भाग पाडत आहेत. ही बाब चुकीची आहे. श्रीगोंदे तालुक्यात 59 ग्रामपंचायतींमधील 567 जागांसाठी 2163 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यांचे अंतिम खर्च घेताना, त्यांना १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेण्यास भाग पाडल्यास, विनाकारण 2 लाख 16 हजार 300 रुपये भुर्दंड बसणार आहे.
न्यायालयात धाव घेणार
शासनाच्या धोरणाविरोधात, विनाकारण १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर घ्यायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकारात लक्ष घालून उमेदवारांचा भुर्दंड वाचवावा, अन्यथा न्यायालयात धाव घेण्याचा इशारा प्रा. दरेकर यांनी दिला आहे.