
कान्हूर पठार वरून नवलेवाडी मार्गे वडगाव दर्याला जोडणा-या रस्त्यावर खडी टाकून दोन ते तीन महिने लोटले आहेत. आता ती खडीही रस्त्यावरून निसटत चालली आहे, यामुळे दुचाकीस्वारांना ते चुकविताना अपघात होत आहेत.
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कान्हूर पठार (ता.पारनेर) येथील टाकळी ढोकेश्वरकडे जाणा-या रोडवरील नवलेवाडी मार्गे वडगाव दर्याला जोडणा-या मार्गावर गेल्या दोन महिन्यांपासून फक्त खडी टाकलेली असल्याने त्यावरून सातत्याने अनेकांचे अपघात होऊन गंभीर जखमी होत आहेत. संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन दिले आहे. तसेच कार्यालयात जाऊन या रस्त्यावर खडीमुळे रोज नागरिकांचे अपघात होत आहेत. त्यात ते गंभीर जखमी होत आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर आपण डांबरीकरण करणार आहात का ? असा सवालही केला आहे.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
याबाबत माहिती अशी की, कान्हूर पठार वरून नवलेवाडी मार्गे वडगाव दर्याला जोडणा-या रस्त्यावर खडी टाकून दोन ते तीन महिने लोटले आहेत. आता ती खडीही रस्त्यावरून निसटत चालली आहे, यामुळे दुचाकीस्वारांना ते चुकविताना अपघात होत आहेत. त्यामध्ये ते गंभीर जखमी होत आहे. गावातील जेष्ठ नागरिक सहादु नवले, विराग मातेरे, अमोल आंधळे, वसंत नवले हे या रस्त्यावरील खडीवरून घसरून जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या नसल्याने अपघातग्रस्त वाहन थेट चारीत जात आहे. रस्त्यावरील बारीक खडी बाजूला येऊन त्यावरून वाहने घसरत आहेत.
स्वच्छता अभियानाने प्रजासत्ताक दिन साजरा; यशवंत प्रतिष्ठानचा उपक्रम
याबाबत ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नवले, प्रसाद नवले, दत्तात्रय ठुबे, ठकाजी ठुबे, रूपाजी ठुबे, शंकर ठुबे यासंह अन्य नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन दिले आहे. यावर त्वरित डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा आपल्या कार्यालयात उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता डी.एम वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले.