नगरच्या कोरोना टेस्ट लॅबला  "आयसीएमआर'ची मान्यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

पालकमंत्री हसन मुश्रीफ व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वारंवार लॅबला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हेही वारंवार जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून लॅबच्या उभारणीबाबत माहिती घेत होते. 

नगर ः कोरोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची चाचणी करून त्यावर वेळ न दवडता तातडीने उपचार करता यावे, यासाठी जिल्हा रुग्णालयात कोविड चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली. त्याला इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांनी अधिकृत मान्यता दिली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विभा दत्ता यांनी यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे या लॅबमध्येच 24 तासांत 300 चाचण्या होणे शक्‍य होणार आहे. 

अवश्‍य वाचा ः नगर शहरातील हा भाग झाला कंटेन्मेंट झाेन

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. कोरोना टेस्ट लॅब आयसीएमआरच्या मानकांनुसार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पालकमंत्री हसन मुश्रीफ व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वारंवार लॅबला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हेही वारंवार जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून लॅबच्या उभारणीबाबत माहिती घेत होते. 

हेही वाचा ः वारी चुकेल रे हरी...वारकऱयांची विठ्ठलाला आर्त हाक
 

अशी मिळाली मान्यता 
औरंगाबाद येथील एका रुग्णाचा घशातील स्त्राव तपासणीसाठी काल (गुरुवार) या लॅबकडे पाठविण्यात आला. त्याचा अहवाल तयार करून नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आला. त्यानंतर स्त्राव अहवालाचे परीक्षण करण्यात आले. तो बरोबर आल्यानंतर तसा अहवाल आयसीएमआरकडे पाठविण्यात आला. आयसीएमआरने सर्व निकष पूर्ण करीत नगरच्या कोरोना टेस्ट लॅबला चाचणीसाठी अधिकृत मान्यता दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To the city's Corona Test Lab Recognition of "ICMR