श्रीरामपूर तालुका वार्ता : हाथरस घटनेप्रकरणी लहुजी सेनेचे उपोषण

गौरव साळुंके
Saturday, 10 October 2020

हाथरस येथील पिडीतेवर झालेल्या अत्याचार घटनेप्रकरणी येथील महात्मा गांधी पुतळयासमोर भारतीय लहुजी सेनेच्या वतीने उपोषण सुरु केले आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : हाथरस येथील पिडीतेवर झालेल्या अत्याचार घटनेप्रकरणी येथील महात्मा गांधी पुतळयासमोर भारतीय लहुजी सेनेच्या वतीने उपोषण सुरु केले आहे. हाथसर (उत्तरप्रदेश) येथील पिडीतेवर अत्याचार करुन तिला मारल्याच्या निषेधार्थ लहुजी सेनेच्या येथील पदाधिकार्यांनी उपोषण करुन पिडितेला न्याय देण्याची मागणी केली. 

शहरातील सर्वच रस्त्यावर शेकडो खड्डे पडल्याने अपघात होत असुन नगरपरिषदेने तातडीने खड्डे बुजविण्यासाठी एकदिवसीय लाक्षणीक उपोषण व धरणे आंदोलन केले आहे. यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी आंदोलकांची भेट घेवुन हाथरस येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच पुढील 15 दिवसात शहरातील रस्ता दुरुस्तीचे कामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी आंदोलनकांनी सहायक पोलिस निरिक्षक समाधान पाटील यांना विविध मागण्याचे निवेदन देवुन सरकारपर्यंत पोहचविची मागणी केली. याप्रसंगी रामचंद्र जाधव, बाळासाहेब बागुल, हनिफ पठाण, सुदर्शन शितोळे, मंगेश छतवाणी, सुरेश आडांगळे, शेख अहमद नसीर, रज्जाक शेख उपस्थित होते. जलील शेख यांनी आभार मानले.

कटारनवरे यांची अध्यक्षपदी निवड
श्रीरामपूर : तालुक्यातील टिळकनगर औद्योगिक वसाहतील कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब गोमाजी कटारनवरे तर सचिवपदी अशोक अर्जुन बोरगे यांची नुकतीच सर्वानुमते निवड झाली आहे. संघटनेचे जेष्ठ सभासद युनुस शेख यांच्या अध्यक्षतेखाली टिळकनगर येथील महादेव मंदिरात कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली.

सभेत कामगार संघटनेच्या पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या. संघटनेच्या अध्यक्षपदासाठी कटारनवरे यांच्या नावाची सुचना उदय राठोड यांनी मांडली त्यास सुरेश अभंग यांनी अनुमोदन दिले. जनरल सचिव पदासाठी बोरगे यांच्या नावाची सुचना अमोल शिंदे यांनी मांडली त्यास सुधाकर सरोदे यांनी अनुमोदन दिले. सभेच्या प्रांरभी भानुदास हिवाळे व रामदास कटारनवरे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

उपाध्यक्षपदी शांत्वन गायकवाड तर सह सचिवपदी बाळासाहेब घोडेकर यांची निवड केली. खजिनदारपदी प्रमोद माघाडे यांची निवड झाली आहे. टिळकनगर पतपेढीचे अध्यक्ष बाळासाहेब विघे, विलास आरणे, सनी साळवे, अनिल जेधे यांची निवड झाली. सभेला माजी अध्यक्ष अशोक जाधव, उदय राठोड, सुरेश अभंग उपस्थित होते. नवनिर्वाचीत सचिव अशोक बोरगे यांनी आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Click here to read news from Shrirampur taluka