esakal | संगमनेर तालुक्यातील ३९ गावे कोरोनापासून दूर; 133 गावात पोचला संसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

Corona positive patients in 133 villages in Sangamner taluka

2 एप्रिल 2020 पासून संगमनेर शहर व आश्वी बुद्रूक या गावापासून संगमनेर तालुक्यात सुरु झालेला कोरोना प्रादुर्भाव तालुक्याच्या 172 गावांपैकी आजपर्यंत 133 गावात पोचला आहे.

संगमनेर तालुक्यातील ३९ गावे कोरोनापासून दूर; 133 गावात पोचला संसर्ग

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : 2 एप्रिल 2020 पासून संगमनेर शहर व आश्वी बुद्रूक या गावापासून संगमनेर तालुक्यात सुरु झालेला कोरोना प्रादुर्भाव तालुक्याच्या 172 गावांपैकी आजपर्यंत 133 गावात पोचला आहे. ही टक्केवारी सुमारे 78 टक्के आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत रविवारी 26 रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या 2 हजार 664 वर पोचली आहे.

कोविड १९ संक्रमणाच्या सुरवातीच्या काळातील भीतीचा पगडा दूर झाल्याने, नागरिकांमधअये मोठ्या प्रमाणात बेफिकीरी वाढली आहे. शहरातील ठराविक ठिकाणी बंदोबस्ताला असलेले पोलिस कर्मचारी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करीत असले तरी, शहराच्या मुख्य बाजारपेठेत मात्र यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे विदारक दृष्य दिसते आहे. विविध प्रकारच्या खरेदीसाठी तालुक्याच्या छोट्या मोठ्या गावातून शहरात आलेल्या ग्रामस्थांकरवी कोरोना गावागावात पोचला असल्याने, सुमारे 172 गावांचा विस्तार असलेल्या संगमनेर तालुक्यातील 133 गावे रविवारी रात्रीपर्यंत कोरोना बाधीत झाली होती.

एवढ्या मोठ्या प्रमाणात संक्रमण सुरु असूनही तालुक्यात सर्वत्र सुरु असलेले लग्न, साखरपुड्याचे सोहळे व दहावे, तेरावे, अंत्यविधी, बारसे आदींसह नुकतेच झालेले पितृपक्ष आदी सामुदायिक कार्यक्रमांमुळे संसर्गजन्य असलेला कोरोना वेगाने हातपाय फैलावतो आहे. मास्क म्हणजे केवळ देखावा झाला आहे. त्याची जागा गळा, हनुवटी किंवा ओठावर आली आहे. पोलिसांना पाहिल्यावर तात्पुरता तो नाकावर घेतला जातो. यात प्रशासनाला घाबरुन नियम पाळण्याची प्रवृत्ती दिसते आहे. सुरवातीला आक्रमक भुमिका घेतलेले प्रशासनही काहीसे बेबस झाले आहे. त्यातच मुंबई, पुणे, नाशिक सारख्या महानगरांतील औद्योगिक वसाहतीत नोकरी करणारे तालुक्यातील अनेक जण परस्पर आपल्या गावातील घरी परतल्याने ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढल्याचा अंदाज आहे.

दरम्यानच्या काळात राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. भास्कर भवर, डॉ. संदीप कचेरिया आदींच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने अनेकविध उपाययोजना केल्या. मात्र अनलॉकनंतरच्या कालावधीत या परिस्थीत झपाट्याने बदल झाल्याचे चित्र आहे. 

नगर जिल्ह्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनावर प्रभावी ठरलेल्या मास्क, सोशल डिस्टंसिंग व सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा जवळपास सर्वांना विसर पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील 33 मृत्यूसह रुग्णसंख्येने 2 हजार 664 चा आकडा गाठला आहे. त्यापैकी 2 हजार 351 रुग्ण बरे होवून त्यांनी घर गाठले आहे. तर सध्या केवळ 279 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.

तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोवीड सेंटर, तसेच कुरण, निमोण, सिध्दकला व कॉटेज हॉस्पिटल, मौलाना आझाद मंगल कार्यालय, वसंत लॉन्स आदी ठिकाणी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून तसेच शहरातील सुमारे 18 खासगी रुग्णालयात कोवीडवर उपचार सुरु आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 89.15 टक्के तर मृत्यूची टक्केवारी 1.25 टक्के आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रणासाठी स्वयंशिस्त पाळण्याची आवश्यकता आहे. अनलॉकच्या दिशेने आपला प्रवास सुरु असल्याने, स्थानिक पातळीवर आठवड्यातील काही दिवस सर्वसंमतीने जनता कर्फ्यू लागू केल्यास या परिस्थितीत थोडा फरक पडण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर