श्रीरामपूर तालुकावार्ता : थत्ते मैदानाची दुरुस्ती करण्याची मागणी

गौरव साळुंके 
Thursday, 17 December 2020

शहरातील थत्ते मैदान परिसरातील जॉगिंग ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी अनेकदा मागणी करण्यात आली. जॉगिंग ट्रॅकवर लाल माती टाकण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. परंतू अद्याप सदर काम झाले नसून मैदानातील खुल्या व्यायाम शाळेतील विविध साहित्य वाढवण्याची आवश्यक्ता आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील थत्ते मैदानातील जॉगिंग ट्रॅकचे मजबुतीकरण, सुशोभीकरण आणि खुल्या व्यायाम शाळेतील साहित्य दुरुस्तीसाठी अनेकदा मागणी करुन त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने जॉगिंग ट्रॅक दुरुस्ती करावी, अन्यथा मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी दिला आहे.

हे ही वाचा : संशयास्पद अडविलेल्या जनावरांची पोलिस ठाण्यात कोंडी 

शहरातील थत्ते मैदान परिसरातील जॉगिंग ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी अनेकदा मागणी करण्यात आली. जॉगिंग ट्रॅकवर लाल माती टाकण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. परंतू अद्याप सदर काम झाले नसून मैदानातील खुल्या व्यायाम शाळेतील विविध साहित्य वाढवण्याची आवश्यक्ता आहे.

या संदर्भात पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा पत्रव्यवहार करुन अद्याप कुठलेही काम झाले नसल्याचा सवाल नगरसेविका खोरे यांनी उपस्थित केला आहे. थत्ते मैदानातील जॉगिंग ट्रॅकवर रोज शेकडो नागरीक फिरण्यासाठी येतात. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने ट्रॅकची दुरुस्ती आणि देखभाल करावी. अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका खोरे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिला आहे.

हे ही वाचा : जुगाड वाहतुकीविरुध्द कारवाईसाठी छावाचे आंदोलन

वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

श्रीरामपूर : येथील सुंदरम युवा फाऊंडेशन आणि ओम साई संघटनेच्या संयुक्त विद्यामाने जेष्ठनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा स्पर्धेस प्रतिसाद मिळाला. युवा फौंडेशनचे रोनीत घोरपडे, ओम साई संघटनेचे अभिषेक गुलदगड यांच्या पुढाकाराने दोन गटात पार पडलेल्या स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम पियुष धस तर द्वितीय तन्वी बकाल आणि अथर्व भालेराव याने तृतीय क्रमांक पटकावला. तर मोठ्या गटात यशश्री कोठारी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. समिक्षा येळवंडे आणि पुजा यादव यांनी दुसरा तर गौरव थोरात याने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांना रोख रक्कमेसह प्रमाणपत्र आणि स्मरणचिन्ह प्रदान करण्यात आले. रवी भागवत यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनुराधा आदिक उपस्थित होत्या.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporator Snehal Ketan Khore has demanded repair of Thatte Maidan in Shrirampur