या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये होणार कोविड सेंटर

अमित आवारी
Sunday, 26 July 2020

नगर शहरात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यामुळे शहरातील महाविद्यालयेही कोविड सेंटर करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. महापालिकेने बुरुडगाव रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोफत कोविड केअर सेंटर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. 

नगर : शहरात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यामुळे शहरातील महाविद्यालयेही कोविड सेंटर करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. महापालिकेने बुरुडगाव रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोफत कोविड केअर सेंटर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. 

अवश्य वाचा - युवा नेत्यासह २३ जणांना कोरोनाची बाधा रॅपीड तपासणीत आढळले पाच रुग्ण

या सेंटरमध्ये 100 खाटांची सोय असेल. महापालिकेच्या कोरोनाबाधित कामगारालाच काल (शुक्रवारी) शहरातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नव्हती. शहरात सहा तास फिरल्यानंतर आमदार संग्राम जगताप व नगरसेवक कुमार वाकळे यांच्या सहकार्याने या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात जागा मिळाली. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज आयुक्‍तांनी, दोन दिवसांत सेंटरची उभारणी व्हावी या दृष्टीने अधिकाऱ्यांना कामाचे वाटप करून दिले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे आवश्‍यक उपकरणे, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, तसेच वैद्यकीय जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोपविली आहे. शहर अभियंता, पाणीपुरवठा विभागप्रमुख, सहायक नगररचनाकार, यंत्र अभियंता, बाळासाहेब देशपांडे दवाखान्यातील प्रमुख आदींनाही कामांचे वाटप करून दिले आहे. 

शासकीय तंत्रनिकेतनच्या मुलांच्या वसतिगृहात हे सेंटर होत आहे. महापालिकेने दोन-तीन महिने आधीच तंत्रनिकेतन प्रशासनाला माहिती दिली होती. आयुक्‍तांनी तेथे आज दोन वेळा पाहणी केली. नगरसह धुळे व जळगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्येही कोविड सेंटर सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The covid Center will be in this Government Technical College