बंदी असतानाही बैलगाडा शर्यत; पुणे जिल्ह्यासह पारनेर तालुक्यातील १४ जणांविरोधात गुन्हा

सनी सोनावळे
Monday, 14 December 2020

काताळवेढे (ता. पारनेर) येथे १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येउन त्यांना अटक करण्यात आली.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानाही बैलगाडा शर्यतींचे आयोजन केल्याबददल काताळवेढे (ता. पारनेर) येथे १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येउन त्यांना अटक करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्यामुळे बैलगाडा शोकिनांमध्ये कमालीची नाराजी आहे.

न्यायालयाने बंदी घातली तरीही काही शोकिन सकाळीच शर्यतींचे आयोजन करून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. तालुक्यातील काताळवेढे येथे (ता. १३) येथे सकाळी साडेसात वाजताच गावापासून सुमारे एक किलोमिटर अंतरावर असलेल्या माळरानाच्या चढावर बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काताळवेढे येथे बैलगाडा शर्यती सुरू असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक पी टी वाघ हे पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तेथे बैलगाडा शर्यती सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्या तात्काळ थांबविण्यात येउन शर्यतींचे आयोजन करणा-या १४ जणांना अटक करण्यात आली.
 

पोलिस नाईक श्यामसुंदर विश्‍वनाथ गुजर यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. आरोपींमध्ये सुभाष रामदास गाजरे, बाबाजी रामदास गाजरे, युवराज रामदास गाजरे, विलास पांडूरंग भाईक, संभाजी सुखदेव भाईक, सोमनाथ पांडूरंग भाईक, धर्मनाथ रघुनाथ भाईक, बाळू बबन गुंड, खंडू कचरू भाईक, विजू दादाभाउ गाजरे, प्रकाश किसन घटाटे (सर्व रा. काताळवेढा, ता. पारनेर) तसेच ज्ञानदेव धनाजी साबळे, विशाल धनाजी साबळे दोघेही (रा. नळावणे ता. जुन्नर, जि. पुणे), सुरेश भीमा काकडे (रा. पळसपूर ता. पारनेर) यांचा समावेश आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against 14 persons from Parner taluka including Pune district