esakal | शिर्डीत भिक्षेकरी, कुत्र्यांवरून राजकारण तापले! विरोधक-सत्ताधाऱ्यांतील वादाने पालिका निवडणुकीची वर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

election

शिर्डीत भिक्षेकरी, कुत्र्यांवरून राजकारण तापले!

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी (जि.अहमदनगर) : कालपर्यंत जे एकमेकांचे मित्र होते, ते आज प्रतिस्पर्धी झाले. ज्यांनी एकत्र येऊन मागील नगरपंचायत निवडणूक लढविली, ते या निवडणुकीपूर्वी एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाले. मोकाट कुत्री व भिक्षेकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापले. विरोधक व सत्ताधारी, नगरपंचायत निवडणूक तोंडावर आल्याची वर्दी देऊ लागले. (dispute-between-opposition-and-ruling-party-Municipal-election-jpd93)

भिक्षेकरी, कुत्र्यांवरून राजकारण तापले

भाजपचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व शिवसेनेचे कमलाकर कोते एकेकाळच्या जिवलग मित्रांनी आज एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. मोकाट कुत्री व प्रत्यक्षात न राबविलेल्या भिक्षेकरी हटाव मोहिमेच्या निमित्ताने, एकमेकांना दूषणे दिली. मागील नगरपंचायत निवडणूक या दोघांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व विजय जगताप यांनी एकत्र येऊन लढविली. आता भाजप विरुद्ध शिवसेना असे चित्र आहे. त्यामुळे या चार मित्रांत सरळ दोन गट पडले, तर मागील निवडणुकीत खाते न उघडू शकलेली राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी शिवसेने सोबत आली.

विरोधक-सत्ताधाऱ्यांतील वादाने पालिका निवडणुकीची वर्दी

शहरात मोकाट कुत्री हटाव मोहीम राबवावी, यासाठी कोते व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयात कुत्री सोडली होती. पाठोपाठ भिक्षेकरी हटाव मोहीम राबवावी या मागणीसाठी आज नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांना व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना निवेदन दिले. हे निवदेन देताना दोघांत तू-तू मै-मै झाली. काल एकमेकांच्या गळ्यात गळा घालणारे आता राजकीय परिस्थिती बदलल्याने एकमेकांच्या विरोधात उभे राहीले. निवेदन देताना राष्ट्रवादीचे रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, महेंद्र शेळके, नीलेश कोते, संदीप सोनावणे, अमित शेळके, तर शिवसेनेचे संजय शिंदे, सचिन कोते, राहुल गोंदकर व विजय जगताप हे पदाधिकारी उपस्थित होते. शहरात भिक्षेकरी व मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. सत्ताधारी म्हणतात आम्ही या दोन्ही मोहिमा राबविणार आहोत, तर विरोधक म्हणतात सत्ताधारी निष्क्रीय असून जाब विचारला की उर्मट भाषेत बोलतात. नगरपंचायत निवडणुका तोंडावर आल्याचे हे लक्षण आहे.

हेही वाचा: वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : छिंदमविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

भिक्षेकरी हटाव मोहिमेसाठी पोलिस व साईसंस्थानची यंत्रणा तयार आहे. मात्र नगरपंचायतीतील सत्ताधारी उदासीन आहेत. निवेदन देण्यास गेलो असता, उर्मट भाषा वापरली. गुरुवारी (ता. २२) आम्ही पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार आहोत. - कमलाकर कोते, शिवसेना नेते

निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन स्टंटबाजी केली जात आहे. भिक्षेकरी प्रश्‍नाबाबत बैठक झाली आहे. विरोधकांनी नगरपंचायतीत कुत्री सोडण्याचा स्टंट केला. राज्यात त्यांचे सरकार आणि मालमत्ता करआकारणी कमी करण्यासाठी आम्हाला निवेदने देत आहेत. - शिवाजी गोंदकर (नगराध्यक्ष)

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! जिल्ह्यातील धरणांत पाण्याची आवक सुरू

loading image