वाढीशिवाय कोयता उचलू नका, धस यांचे ऊसतोड कामगारांना आवाहन

वसंत सानप
Sunday, 4 October 2020

ऊसतोडणी मजुरांना दीडशे टक्के वाढ, मुकादमांना 37 टक्के कमिशनवाढ, तर वाहतूकदारांना पन्नास टक्के वाहतूक दरवाढ मिळावी, तसेच कायद्याचे अधिष्ठान मिळायला हवे, याकरिता तुम्ही आंदोलनाला साथ द्या.

जामखेड : "ऊसतोडणी मजूर, मुकादम व वाहतूकदारांना लोकनेते (स्व.) गोपीनाथ मुंडे यांनी तीन वेळा वाढ दिली होती. त्यांपैकी दोन वेळा मी त्यांच्यासोबत होतो. या वेळीही वाढ आणि कायद्याचे अधिष्ठान मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. वाढ मिळाल्याशिवाय जागा सोडू नका,'' असे आवाहन माजी मंत्री आमदार सुरेश धस यांनी ऊसतोड मजुरांना केले. 

ऊसतोडणी मजूर मुकादम संघटनेच्या खर्डा (ता. जामखेड) येथील बैठकीत ते बोलत होते. या वेळी माजी सरपंच संजय गोपाळघरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस 
रवी सुरवसे, वैजिनाथ पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते महेंद्र आदींसह मुकादम, ऊसतोडणी कामगार आणि वाहतूकदार उपस्थित होते. 

धस म्हणाले, ""ऊसतोडणी मजुरांना दीडशे टक्के वाढ, मुकादमांना 37 टक्के कमिशनवाढ, तर वाहतूकदारांना पन्नास टक्के वाहतूक दरवाढ मिळावी, तसेच कायद्याचे अधिष्ठान मिळायला हवे, याकरिता तुम्ही आंदोलनाला साथ द्या. बीड आणि नगर या दोन जिल्ह्यांतील ऊसतोडणी मजूर-मुकादम हलले नाहीत, तर राज्यातील आणि कर्नाटकातील कारखाने सुरू होऊ शकणार नाहीत.'' 
यानिमित्ताने त्यांनी ऊसतोडणी मजुरांची व्यथा सांगितली, तसेच मुकादमांची झालेली दयनीय अवस्थाही मांडली. व्याजाच्या गर्तेत ते सापडले आहेत. त्यांना सहकारी बॅंकांनी अथवा अन्य राष्ट्रीय बॅंकांनी मदत केली नाही.

दुसरीकडे, कारखानदार मात्र मोठे होत चालले. एकापेक्षा अधिक कारखाने या कारखानदारांचे झाले, तरीही कारखानदारी कशी अडचणीत आहेत ते सांगा, असा सवाल उपस्थित करीत, जोपर्यंत वाढीचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत तुम्ही जागा सोडू नका, असे आवाहन त्यांनी केले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not break sugarcane without getting increased rates