अधिकाऱ्यांमध्ये वाद, गोत्यातलं अर्थकारण; शिर्डी संस्थानचा खर्च वाढला

सतीश वैजापूरकर
Wednesday, 17 February 2021

साईसंस्थानचा दररोजचा खर्च तब्बल 1 कोटी रूपये आहे. सध्या दररोजचे उत्पन्न 75 लाख रूपये आहे. याचा अर्थ असा की साईमंदिर खुले झाले तरी दररोजची तुट तब्बल २५ लाख रूपयांची आहे.

शिर्डी (अहमदनगर) : साईमंदिराचे दरवाजे खुले झाले. पहिल्या तिमहीत ढासळलेले अर्थकारण सावरणे अपेक्षित होते पण ते बाजूला राहिले. प्रत्यक्षात बाबांची शिर्डी वितंडवादाने अधिक गाजली. साईसंस्थान आणि व्यावसायिकांची स्थिती आमदनी आठंन्नी खर्चा रूपया अशी झाली. खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लागत नाही. कोविडमुळे दर्शनार्थींच्या संख्येवर मर्यादा आल्याने शिर्डी भोवतालचा आर्थिक मंदिचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. एका अर्थाने ही चिंता वाढविणारी स्थिती आहे. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

साईसंस्थानचा दररोजचा खर्च तब्बल 1 कोटी रूपये आहे. सध्या दररोजचे उत्पन्न 75 लाख रूपये आहे. याचा अर्थ असा की साईमंदिर खुले झाले तरी दररोजची तुट तब्बल २५ लाख रूपयांची आहे. सुदैवाने ठेवीवरच्या व्याजाचे दैनंदिन उत्पन्न 50 लाख रूपये मिळते. त्यामुळे तोंडमिळवणी होते. साई मंदिर आठ महिने बंद होते. त्याकाळात उत्पन्न जवळपास बंद आणि दररोज सुमारे पन्नास लाख रूपये खर्च सुरू होता. या आठ महिन्यात ढोबळमानाने बाबांच्या तिजोरीतून शंभर ते सव्वाशे कोटी रूपये खर्च करावे लागले. 

फास्टॅगला हिवरगाव पावसामध्ये फाटा, स्थानिकांही पडतोय नाहक भुर्दंड

कोविड प्रकोपापूर्वी दररोज सरासरी पन्नास हजार भाविक यायचे. आता हि संख्या वीस हजारापर्यत गेली आहे. याचा अर्थ असा की साईसंस्थानचे अर्थकारण रूळावर येण्यासाठी हि संख्या दुप्पटीहून अधिक व्हायला हवी. कोविडच्या खबरदारी उपाययोजनांमुळे तुर्त तरी तशी शक्यता नाही. कोविड संसर्गाच्या भितीमुळे स्वतःची वाहने घेऊन येणा-या दर्शनार्थींची संख्या मोठी आहे. दर्शन आटोपले की घरचा रस्ता धरणे त्यामुळे सोपे होते. कोविड नव्हता त्यावेळीही येथे भाविक मुक्कामास उत्सुक नसायचे. आता तर त्यांची संख्या निम्म्याने कमी झाली. पूर्वीच्या तुलनेत शिर्डीवारीचा खर्च वाढला. त्यामुळे सामान्य भाविकांकडून दानपेटीत टाकल्या जाणा-या दानावरही परिणाम झाला. शहरातील व्यावसायिकांचे आर्थिक गणित पुरते कोलमडले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई- सकाळचे ऍप 

साई मंदिर बंद होते, त्याकाळात साईसंस्थानने काटकसरीच्या कुठल्या उपाययोजना केल्या. या काळात अधिकारी वर्गाला फुरसत होती. त्यांनी कुठली महत्वाची कामे मार्गी लावली. भाविकांसाठी कुठल्या योजना तयार केल्या. याबाबत अद्यापतरी साईसंस्थानच्या अधिका-यांनी नित्याच्या पत्रकारपरिषदात माहिती दिलेली नाही. अर्थकारण सावरण्या ऐवजी विंतडवादावर अधिका-यांची बरीच शक्ती विनाकारण खर्च झाली. आता तरी घटलेले उत्पन्न आणि वाढता खर्च या अर्थिकपेचातून काही मार्ग काढता येईल का. भाविकांना एक दोन दिवस मुक्काम करता येईल, यासाठी काही प्रकल्प तातडीने उभारता येतील का. यासाठी अधिका-यांनी वेळ खर्च केला तर बरे होईल, अशी जाणकारांची अपेक्षा आहे. 

मंदिच्या विळख्यात शिर्डी

साईमंदिर खुले होऊन तिन महिने झाले. अद्यापही निम्मी बाजारपेठा बंद आहे. जी दुकाने खुली झाली त्यांचा पुरेसा व्यवसाय होत नाही. दुकानांच्या भाड्यात निम्म्याने घट झाली. भाविक स्वतःच्या किंवा भाड्याच्या वाहनांनी येतात, त्यामुळे मुक्कामी रहाणा-या भाविकांच्या संख्येत आणखी घट झाली. त्यामुळे निम्म्याहून अधिक लाॅजेस व हाॅटेल बंद आहेत. गोत्यात आलेले शिर्डीचे अर्थचक्र अद्याप तरी सावरताना दिसत नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The doors of Shirdi Sai Temple have been opened for Darshan