डॉ. विखे पाटलांनी फोडला व्हीआरडीई स्थलांतर चर्चेचा फुगा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

नगरमधील व्हीआरडीईच्या स्थलांतराबाबत मागील दोन दिवसांपासून चर्चांना उधाण आले होते.

नगर ः ""नगरमधील व्हीआरडीईच्या स्थलांतराचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. याबाबतच्या चर्चा निरर्थक आहेत. उलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत योजनेतून या संस्थेचे अधिक मजबुतीकरण करण्याची ग्वाही व्हीआरडीईच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे,'' असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. 

नगरमधील व्हीआरडीईच्या स्थलांतराबाबत मागील दोन दिवसांपासून चर्चांना उधाण आले होते. या पार्श्‍वभूमीवर डॉ. विखे पाटील यांनी दिल्लीतील व्हीआरडीई अध्यक्षांचे तांत्रिक सल्लागार संजीव कुमार, संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात शहानिशा केली. 

हेही वाचा - शेवटच्या मंगलाष्टकावेळी नवरदेव कोसळला

या बाबत डॉ. विखे म्हणाले, ""नगर येथील व्हीआरडीई संस्था स्थलांतरित करण्याचा कोणताही प्रस्ताव संरक्षण विभागाकडे नाही. याबाबतची चर्चा निरर्थक असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. व्हीआरडीई संस्था नगरमध्येच राहणार असून, आत्मनिर्भर भारत योजनेतून या संस्थेच्या अधिक बळकटीकरणाचा केंद्र सरकारचा मानस आहे.

अन्य प्रकल्पही देण्याचा विचार व्हीआरडीई अधिकाऱ्यांनी बोलून दाखविल्याने, जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरेल. याबाबत नगर येथील व्हीआरडीई अधिकारी- कर्मचाऱ्यांना माहिती देणार आहे.'' 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Vikhe Patil said VRDE will not migrate