एचआयव्हीग्रस्तांना घरपोच औषधोपचार 

दौलत झावरे
सोमवार, 1 जून 2020

एचआयव्हीग्रस्त रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका अधिक असल्याने औषधे घरपोच देण्यात येत आहेत. कोरोनामुळे जामनेर, मुंबई, नाशिक, सिन्नर, विजयपूर, येवला येथील, जिल्ह्याबाहेरून आलेल्या एकूण 73 जणांना औषधांचा पुरवठा घरपोच केला जात आहे. 

नगर  : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे एचआयव्हीग्रस्तांना बाहेर पडणे अशक्‍य झाले आहे. वेळेत उपचार न केल्यास आजार बळावू शकतो. त्यामुळे त्यांना घरीच औषधे उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा रुग्णालयाने घेतला आहे. जिल्हा एड्‌स नियंत्रण कक्षासह विहान संस्थेमार्फत जिल्ह्यातील 10 हजार एचआयव्हीग्रस्तांना घरपोच औषधपुरवठा करण्यात येत आहे. 

कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे एचआयव्हीग्रस्तांना घराबाहेर पडणे अशक्‍य झाले. घराजवळील रुग्णालयात औषधे उपलब्ध असली, तरी ती घ्यायला गेल्यावर कोणी पाहिले तर काय म्हणतील, या भीतीने अनेक जण गावापासून लांबच्या रुग्णालयातून उपचार घेत आहेत.

 

क्लिक करा ः शुल्कासाठी शाळांचा तगादा
 

 

हीच बाब ओळखून जिल्हा प्रशासनाने या रुग्णांना घरपोच औषधे देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विहान संस्थेची मदत घेतली. त्यासाठी रुग्णांची आकडेवारी तालुकानिहाय तयार करून ती यादी विहान संस्थेला देण्यात आली. त्यानंतर संस्थेमार्फत सर्व रुग्णांना घरपोच औषधे देण्यात आली. लॉकडाउन असेपर्यंत असाच औषधपुरवठा करण्यात येणार आहे. 

एचआयव्हीग्रस्त रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका अधिक असल्याने औषधे घरपोच देण्यात येत आहेत. कोरोनामुळे जामनेर, मुंबई, नाशिक, सिन्नर, विजयपूर, येवला येथील, जिल्ह्याबाहेरून आलेल्या एकूण 73 जणांना औषधांचा पुरवठा घरपोच केला जात आहे. 

हेही वाचा ः 72 वर्षांपूर्वीची 73व्या वर्षात पुनरावृत्ती 

 

जिल्हा एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, 36 समुपदेशक, 27 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक औषधनिर्माता, तीन आरोग्य परिचारिका, दोन डॉक्‍टर, चार लिपिक, दोन डेटा एंट्री ऑपरेटर, एक समन्वयक आदी 90 कर्मचाऱ्यांमार्फत एचआयव्हीग्रस्तांवर उपचार केले जात आहेत. 

अवश्य वाचा ः कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंद्याच्या शेतकऱ्याचा अजित पवारांना फोन... संभाषणाची क्‍लिप झाली व्हायरल 

 

विहान संस्थेच्या माध्यमातून घरोघरी पोच औषधे : जाधव

 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेच सरकारी रुग्णालयामार्फत औषधे उपलब्ध करून विहान संस्थेच्या माध्यमातून घरोघरी पोच केली जात आहेत. 
- शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष 

येथे होतात उपचार 
जिल्हा रुग्णालयासह प्रवरा ग्रामीण रुग्णालयात प्रथम एचआयव्हीग्रस्तांची पूर्ण तपासणी झाल्यावर त्याच्यावर 13 ठिकाणी लिंक एआरटी सेंटरसह 11 ग्रामीण रुग्णालये व दोन उपजिल्हा रुग्णालयांमार्फत 9792 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. 

बाहेरून मागविली औषधे ः मुरंबीकर

कोरोनाच्या काळात एचआयव्हीग्रस्तांना वेळेत औषधे मिळावीत, यासाठी राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत यंत्रणा काम करीत आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णांना आवश्‍यक असलेली औषधे मुंबई, पुणे, औरंगाबाद येथून उपलब्ध केली असून, औषधांचा पुरेसा साठा आहे. 
- डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drugs found at the door of AIDS sufferers