वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात

केशव चेमटे
Tuesday, 12 January 2021

गतवर्षी जूनपासून नियमित पाऊस झाल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जेमतेम हातात पडला. खरिपातील मुगाच्या पिकावर शेतकऱ्यांना वार्षिक खर्चाची जुळवाजुळव करता येते. मात्र, यंदा मुगाच्या पिकाने पूर्ण निराशा केली.

भाळवणी (अहमदनगर) : विचित्र हवामानामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, हातातोंडाशी आलेला घास वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. औषधफवारणीचा अतिरिक्त खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
गतवर्षी जूनपासून नियमित पाऊस झाल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जेमतेम हातात पडला. खरिपातील मुगाच्या पिकावर शेतकऱ्यांना वार्षिक खर्चाची जुळवाजुळव करता येते. मात्र, यंदा मुगाच्या पिकाने पूर्ण निराशा केली. खरिपाच्या पेरणीसाठी कर्ज काढले; मात्र हंगाम वाया गेला. रब्बीतही सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या. यासाठी पुन्हा आर्थिक तरतूद करता करता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले. किमान रब्बी पदरात पडेल, या आशेने गहू, हरभरा व कांद्याचे महागडे बियाणे घेऊन पेरणी व लागवड केली. 

हे ही वाचा : शासकीय तूरखरेदी केंद्रास माळवाडगाव येथे प्रारंभ

चार दिवसांपासून हवामानात कमालीचा बदल झाला असून, पाऊस, धुके व थंडीही गायब झाली. त्यामुळे पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. ज्वारीवर चिकटा, हरभऱ्यावर घाटेअळी, गव्हावर मावा, तांबेरा, तर कांद्यावर करपा पडला आहे. यंदा अनेकांनी वाटाणाही पेरला आहे. वाटाण्याचा तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, हवामानातील बदलामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढला. विविध रोगांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी धडपडत असून, औषधफवारणी सातत्याने करावी लागते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers have found themselves in financial crisis due to the increased cost of spraying