असं काय आहे आर्थिक गणित, सगळ्याच शेतकऱ्यांना लावायचीय सीताफळाची बाग

सूर्यकांत नेटके
Friday, 18 December 2020

नगरच्या कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा 12 हजार 200 शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली आहे.

नगर : जिल्ह्यात यंदा मुबलक पाणी उपलब्ध असल्याने, तसेच फळपिकांना अधिक मागणी राहिल्याने फळपीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे दिसते. वाढती मागणी पाहून कृषी विभागानेही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 5 हजार 70 हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे.

आतापर्यंत 12 हजार 200 शेतकऱ्यांनी फळबाग लागवड अनुदानासाठी अर्ज केले आहेत. इतर फळपिकांपेक्षा सीताफळ लागवडीला अधिक प्राधान्य असल्याचे सांगण्यात आले. 

नगर जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती चांगली राहिली. शिवाय यंदा वर्षभर फळांनाही मोठी मागणी होती. पावसामुळे अन्य पिकांचे नुकसान झाले असेल, तरी त्या तुलनेत फळबागांचे नुकसान कमी आहे. त्यामुळे यंदा फळपिकांकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येते.

हेही वाचा - करमाळ्यात नरभक्षक बिबट्या अखेर ठार

पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना बंद असली, तरी पाच एकरांच्या आतील क्षेत्र असलेले शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीवर भर देत आहेत. 

नगरच्या कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा 12 हजार 200 शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली आहे. कृषी विभागाचे 5 हजार 70 हेक्‍टरवर महात्मा फुले राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यातील आतापर्यंत 2 हजार 895 शेतकऱ्यांनी 1 हजार 936 हेक्‍टरवर लागवड केली आहे.

हेही वाचा - माजी आमदार कर्डिलेंवर व्याह्याचा टोमणा

11 हजार 875 शेतकऱ्यांच्या 7 हजार 853 हेक्‍टरसाठी तांत्रिक मान्यता व तेवढ्याच क्षेत्राला प्रशासकीय मान्यता दिल्याचे कृषी उपसंचालक विलास नलगे यांनी सांगितले. पावसामुळे आतापर्यंत फळबाग लागवडीचा वेग कमी होता. मात्र, पुढील तीन महिन्यांत अधिक प्रमाणात फळबाग लागवड होईल. शेतकरी यंदा इतर फळपिकांपेक्षा सीताफळ लागवडीला अधिक प्राधान्य देत असल्याचेही नलगे म्हणाले. 

गेल्यावर्षी केवळ 515 हेक्‍टरवर लागवड 
नगर जिल्ह्यात गेल्यावर्षी (2019-20) कृषी विभागाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केवळ 515 हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली. पाच एकरांवरील शेतकऱ्यांसाठी असलेल्या पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतून फळबाग लागवड झाली असली, तरी ती फारशी नाही. यंदा फुंडकर फळबाग लागवड योजना बंद आहे. मात्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड होत असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Nagar district focus on custard apple cultivation