थांब बाबा थोडा... सततच्या पावसाने पिके सडण्याची भीती

सतीश वैजापूरकर
मंगळवार, 30 जून 2020

यंदा चार महिन्यांच्या पावसाळ्यातील एकूण सरासरीच्या तब्बल 70 टक्के पाऊस पहिल्याच महिन्यात झाला. जाणकारांच्या निरीक्षणानुसार, गेल्या काही वर्षांपासून पावसाने आपला "पॅटर्न' बदलला. पूर्वी तो चार महिन्यांत विभागून पडायचा. आता ठरावीक भागात धो धो पडतो आणि सरासरी पूर्ण करतो. पावसाच्या बदलाचा फटका शेतीला बसतो

राहाता : रोहिणी, मृगापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रातही पावसाने कृपा केली. गेल्या आठ दिवसांपासून, तर तो रोज हजेरी लावतो आहे. पावसाळ्याच्या प्रारंभीच्या जूनमध्ये एकूण सव्वातीनशे मिलिमीटर पाऊस झाला.

यंदा चार महिन्यांच्या पावसाळ्यातील एकूण सरासरीच्या तब्बल 70 टक्के पाऊस पहिल्याच महिन्यात झाला. जाणकारांच्या निरीक्षणानुसार, गेल्या काही वर्षांपासून पावसाने आपला "पॅटर्न' बदलला. पूर्वी तो चार महिन्यांत विभागून पडायचा. आता ठरावीक भागात धो धो पडतो आणि सरासरी पूर्ण करतो. पावसाच्या बदलाचा फटका शेतीला बसतो. 

हेही वाचा : साहेब काही तरी बघा, मोंदीचे पैसे येईनात 

पूर्वी जूनमध्ये 20 टक्के, जुलै व ऑगस्टमध्ये प्रत्येकी 30 टक्के, सप्टेंबरमध्ये 20 टक्के, असे पावसाचे प्रमाण वर्षानुवर्षे कायम होते. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात दर वर्षी सरासरी 450 ते 500 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा पहिल्याच महिन्यात सव्वातीनशे मिलिमीटर पाऊस झाला. 

पावसाने रूप बदलले. आता तो विशिष्ट भागात धो धो कोसळतो. वेगाने सरासरी पूर्ण करतो. मात्र, दोन पावसांत मोठा खंड पडतो. त्यामुळे निव्वळ पावसावर अवलंबून असलेल्या खरीप पिकांना मोठा फटका बसतो. शेती आणि शेतकऱ्यांना सरासरीएवढा पाऊस होऊनही नुकसान सोसावे लागते. आधी जादा पावसामुळे, तर खंड पडल्यावर पावसाअभावी, असे पिकांचे दुहेरी नुकसान होते. 

धरण लाभक्षेत्रातच पाऊस 

गेल्या आठ दिवसांत सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या पूर्वेला जवळपास रोज पाऊस होतो आहे. दुसरीकडे, कोकण, मुंबईत अद्याप मॉन्सूनने जोर धरलेला नाही. त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीतील धरणांत नव्या पाण्याची आवक फारशी नाही. या धरणांच्या लाभक्षेत्रात मात्र धो धो पाऊस कोसळतो आहे. धरणाखालील बाजूस जोरदार पाऊस होत असल्याने धरणांचे दरवाजे बंद आणि गोदावरी नदी व कालवे वाहते झाले आहेत. 

कोवळी पिके सडण्याचा धोका 

सध्या दुपारपर्यंत हवेत कमालीचा उकाडा आणि दमटपणा जाणवतो. दुपारनंतर जोराचा पाऊस होतो. सातत्याने चांगला पाऊस होत असल्याने, काही ठिकाणी शेतांत पाणी साठून खरिपाची कोवळी पिके सडू लागली आहेत. येत्या दोन-चार दिवसांत पावसाने उघडीप दिली नाही, तर खरिपाची पिवळी पडू लागलेली कोवळी पिके हातची जाण्याचा धोका आहे. त्याच वेळी काही भागात गरज असूनही पुरेसा पाऊस नाही, असे परस्परविरोधी चित्र आहे. 

असे चित्र पाहिले नाही.. 

गोदावरी कालव्यांच्या काही भागात यंदा जूनअखेर सरासरीच्या 65 ते 70 टक्के पाऊस झाला. असे चित्र यापूर्वी पाहिल्याचे आठवत नाही. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मॉन्सून स्थिरावला नसताना, लाभक्षेत्रात तो रोज हजेरी लावतो. पाऊस ठरावीक अंतराने झाला तरच खरिपाला त्याचा फायदा होतो. 
- उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of crop rot due to continuous rains