डॉ. बोरगे, मिसाळ पसार; डॉ. राजूरकर, बल्लाळ यांच्याकडे पदभार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याच्या गुन्हा दाखल झाल्याने महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ गेल्या दोन दिवसांपासून पसार झाले आहेत. आरोग्य विभागाचा पदाभार डॉ. सतीश राजूरकर व अग्निशमन विभागाचा अतिरिक्त भार उपअभियंता कल्याण बल्लाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

नगर : घरात घुसून अल्पवयीन मुलाला जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, आपत्ती व्यवस्थापनप्रमुख शंकर मिसाळ व कर्मचारी बाळू घाटविसावे शहरातून पसार झाले आहेत. पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी या तिघांचा शोध घेतला. 

हेही वाचा रेकॉड ब्रेक : नगर जिल्ह्यात दिवसभरात 43 कोरोना रुग्ण 

बोल्हेगाव येथील 14 वर्षीय शाळकरी मुलाच्या घरात घुसून, मद्यप्राशन करून डॉ. बोरगे, मिसाळ व घाटविसावे यांनी गोंधळ घातला. पीडित मुलाच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तोफखाना पोलिसांची दोन पथके आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, आरोपी पसार झाले आहेत. त्यांनी मोबाईल बंद केले आहेत. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन, तसेच महापालिका कार्यालयात चौकशी केली. दरम्यान, बुरुडगाव परिसरातील हॉटेलमध्ये डॉ. बोरगे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित हॉटेलवर छापा घातला. मात्र, तेथे डॉ. बोरगे सापडला नाही. गेल्या दोन दिवसांपासून ते महापालिकेतही हजर नाहीत. 

आवश्‍य वाचा फेरफार नडली : मंडलाधिकारी आव्हाड व तलाठी कैदके निलंबित 

दरम्यान, कोरोनासंदर्भातील नोडल अधिकारी म्हणून डॉ. बोरगे काम पाहत होता. त्याचा पदभार आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अग्निशमन विभागाचा भार उपअभियंता कल्याण बल्लाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बल्लाळ यांची विद्युत विभागातून बदली करण्यात आली असून, त्यांना अतिक्रमणविरोधी विभागप्रमुख करण्यात आले आहे. विद्युत विभागप्रमुखपदाचा अतिरिक्‍त पदभार राजेंद्र मेहेत्रे यांच्याकडे सोपविला आहे. महापालिकेत आधीच अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. काही अधिकाऱ्यांकडे दोन-दोन विभागांचा पदभार आहे. असे असताना डॉ. बोरगे व मिसाळ नसल्याने महापालिकेच्या उर्वरित अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढू लागला आहे. 

हेही वाचा क्‍या बात है होमिओपॅथी कोरोनावर ठरतेय असरदार, नगरच्या डॉक्‍टरांचे हे आहेत निष्कर्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fearing arrest, Dr. Borge, Misal left the city