VIDEO : भाजपतील गांधी पर्व ः राजकीय प्रवास आणि किस्से

Former Union Minister Dilip Gandhi's political journey
Former Union Minister Dilip Gandhi's political journey

अहमदनगर ः माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी हे केवळ भारतीय जनता पक्षापुरते मर्यादित नव्हते. त्यांचा सर्वसामान्यांसोबत थेट संपर्क होता. कोणत्याही पक्षातील असो ते त्याच्या कधीही तुसडेपणाने वागले नाही. एक छोटा व्यावसायिक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली होती. व्यावसाय करताना त्यांनी नेहमी सामाजिक कामात भाग घेतला.

६ एप्रिल १९८० साली जनता पक्षातून बाहेर पडल्यानंतर जनसंघाच्या लोकांनी भारतीय जनता पक्ष स्थापन केला. पहिले अध्यक्ष वाजपेयी होते. प्रदेशचे अध्यक्ष राहिले उत्तमराव पाटील. नगरमध्ये गुलशन जग्गी शहराध्यक्ष झाले.

राजाभाऊ झरकर, राजाभाऊ कुलकर्णी, बंडोपंत कुलकर्णी, सुधारकर कुलकर्णी, प्रभाकरपंत दसरे, अॅड. गीता रानडे, सुमतीबाई बर्डे, सुवासिनी पाठक, अनिल गट्टाणी, प्रभा दाभोलकर, सप्तर्षी वहिनी यांचा समावेश होता. स्थापनेनंतर दोन-तीन महिन्यात मुंबईचे अधिवेश होते. त्यापूर्वी दिलीप गांधी यांनी पक्षप्रवेश केला होता. त्यांना लगेच सरचिटणीसपद देण्यात आले.

मंत्रिपद दिलं तरी तिकिट डावललं

पक्षात आल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. शहरात पक्ष वाढवतानाच जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांवर गेले. नगर पालिकेतही नगरसेवकही झाले. पुढे १९९९च्या लोकसभा निवडणुकीत घनश्याम शेलार यांना भाजपने तिकीट दिले. या विरोधात पक्षातील कार्यकर्त्यांनी दिलीप गांधी यांच्या तिकिटासाठी आग्रह धरला. आणि पक्षनेतृत्वाने गांधी यांना तिकिट दिले. या निवडणुकीत गांधी विजयीही झाले. पुढच्या अडीच वर्षांत वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्रीही झाले. २००४च्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आलं. त्याचा पक्षाला फटका बसला. २००९मध्ये ते पुन्हा खासदार झाले. पुढच्या पंचवार्षिकला त्यांनी विजयी परंपरा कायम ठेवली. परत एकदा त्यांचे तिकीट कापण्यात आलं.

गांधी यांचे दातृत्त्व

दिलीप गांधी यांचा कार्यकर्त्यांसोबत थेट संपर्क होता. त्यांनी आपल्या मुलांची लग्न धुमधडाक्यात केली. प्रत्येक लग्नाला मतदारसंघातील प्रत्येक गावातील वऱ्हाड आलं होतं. त्यांच्या घरी गेलेला माणूस न जेवता माघारी आला असे झाले नाही. त्यांच्या पत्नी सरोजभाभी यांचाही कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी आग्रह असायचा.

या कामांचे क्रेडिट दिलीपजींचेच

गांधी यांना भेटण्याची अगदी सोपी प्रक्रिया होती. कोणालाही कार्यकर्त्याला त्यांना सहज भेटता यायचं. खासदार झाल्यावर ते वाड्या-पाड्यावर गेले. तेथे सभामंडप, रस्ते, दिवे असं काही ना काही दिलं. त्यामुळे पक्षाची प्रतिमाही उजळली. जिल्ह्यात अनेक बडे नेते आहेत. ते आपापल्या तालुक्यातील विकासावर लक्ष केंद्रीत करीत आले आहेत. गांधी यांनी प्रथम नगर शहर टार्गेट केले. येथे विमानतळ झालं पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न होता. परंतु त्यांना इतरांची साथ मिळाली नाही. पर्यटनवाढीवरही त्यांचा भर होता. शहरातील उड्डाण पूल, नगर-पुणे शटर सेवा, दौंड-मनमाड मार्गाचे दुहेरीकरण, नगर-परळी रेल्वे मार्गासाठी ते सातत्याने भांडायचे. त्यांचे विमानतळाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी भाजप नेते व खासदारांवर आली आहे. 

नाट्यसंमेलनही केले यशस्वी

नगरमध्ये पर्यटन वाढले पाहिजे. कलेतही ते चमकले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. अखिल भारतीय नाट्य संमेलन नगरमध्ये यशस्वी कुणामुळे झाले असेल तर ते दिलीप गांधी यांच्यामुळे. नाट्यकर्मी सतीश लोटके याबद्दल नेहमी त्यांना क्रेडिट देतात. मामा तोरडमल आणि मच्छिंद्र कांबळी वाद झाले होते. मामांनी भोजनभाऊ अशी त्यांची संभावना केली होती. त्यामुळे हे संमेलन उधळले जाण्याची शक्यता होती. परंतु गांधी यांनी ते संमेलन यशस्वी करून दाखवले.

मितभाषी गांधी

गांधी हे कधीही कोणाला तोंड टाकून बोलले नाही. एखादेवेळी ते वरच्या आवाजात कोणाला बोललेही असतील. परंतु त्यांच्या ठायी प्रेमभाव होता. राजकीय विरोधकांनाही त्यांनी सन्मानाने वागवले. काहीजण त्यांना भाजपचे गांधी म्हणायचे. नावाप्रमाणेच त्यांनी गांधीवाद जपला. ते कट्टर हिंदुत्त्ववादी विचारसरणीचे होते. परंतु अन्य धर्मातील लोकांचा त्यांनी कधीही तिरस्कार केला नाही. पक्षाच्या कार्यकारिणीत मुस्लिम किंवा अन्य समाजाचे कार्यकर्ते हवेच असे त्यांना वाटायचे.

भाषणाची स्टाईल

कोणत्याही राजकीय सभेतील भाषण असो नाही तर अन्य कोणता सोहळा असो. त्यांची भाषणाची सुरूवात ठरलेली असायची. श्री विशाल गणेशाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक नगरीत... अशी ते सुरूवात करायचे. भाषणाच्या मध्येच ते खाकरायचे. ती त्यांची स्टाईलच होती.

संघर्षशील नेता

दिलीप गांधी, सुनील काळे आणि माझे राजकीय गुरू गुलशनसेठ जग्गी होते. त्यांच्या तालमीत आम्ही तयार झालो. गांधी हे अल्पसंख्याक समाजातील असतानाही त्यांनी अठरापगड जातीतील लोकांना बरोबर घेतल्याने पक्ष विस्तारला. महापालिका पक्षाच्या ताब्यात आली. जिल्ह्यातही फिल गुड वातावरण तयार झालं.

- अनिल गट्टाणी, ज्येष्ठ कार्यकर्ते भाजप.

गांधी यांनी पक्षाचा विस्तार केला, हे कोणीही नाकारू शकणार नाही. पक्षाने दिलेल्या पदाला जागून त्यांनी विस्ताराचे काम केले. त्यामुळे आज घरातील कर्ता पुरूष गेल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.

- प्रा. भानुदास बेरड, माजी शहर जिल्हाध्यक्ष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com