गोधन फार्मतर्फे दुध उत्पादक सभासदांना अकरा लाख रुपये रिबेट वाटप

विलास कुलकर्णी
Saturday, 14 November 2020

मालुंजे येथे गोधन फार्मतर्फे मागील वर्षभरात दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या बिलातून एक पैसाही कपात न करता, दिवाळी बोनस म्हणून निव्वळ नफ्यातून प्रतिलीटर एक रुपया 51 पैसे प्रमाणे अकरा लाख रुपये रिबेट वाटप केले.

राहुरी (अहमदनगर) : मालुंजे येथे गोधन फार्मतर्फे मागील वर्षभरात दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या बिलातून एक पैसाही कपात न करता, दिवाळी बोनस म्हणून निव्वळ नफ्यातून प्रतिलीटर एक रुपया 51 पैसे प्रमाणे अकरा लाख रुपये रिबेट वाटप केले. शेतकऱ्यांचा शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तर शेतकऱ्यांच्या पत्नींचा पैठणी व मिठाई भेट देऊन सन्मान करण्यात आला. 

हेही वाचा : अरुणोद्य मिल्ककडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी फराळ व लाभांश वाटप
दूध संकलन केंद्राच्या संचालकांना चांदीचे नाणे भेट देण्यात आले. गोधन फार्मच्या अध्यक्ष ज्योती चौगुले, संचालक निखिल चौरे, दैवत डेअरीचे अध्यक्ष केशव शिंदे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी शिवाजी शिंदे होते. पंचमहलचे महाव्यवस्थापक प्रभाकर चौरे, सरपंच सर्जेराव सोळुंके, प्रियदर्शनीचे अध्यक्ष अरुण फलके, तृप्ती मिलचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, पियुष शिंदे उपस्थित होते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गोधन फार्मतर्फे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दूध व्यवसायात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याच्या उद्देशाने मालुंजे येथे आधुनिक दूध संकलन केंद्र उभारले. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीबरोबर सामाजिक बांधिलकी जपत आहे.

मालुंजे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारत बांधकाम, मारुती मंदिर जीर्णोद्धार, धार्मिक सप्ताह, शालेय मुलींचे स्वच्छतागृह बांधकाम, हारदे-काळेवस्ती नवीन रस्ता बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री फाऊंडेशनसाठीही आर्थिक मदत केल्याचे गोधन फार्मच्या अध्यक्ष ज्योती चौरे यांनी सांगितले.  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Godhan Farm distributes rebate of Rs 11 lakhs to milk producing members