esakal | गुड न्यूज ः तलाठी भरतीला सरकारचा ग्रीन सिग्नल, नगरसाठी वेगळा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Good news: Government's green signal for Talathi recruitment, a different decision for the city

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात होती. मात्र, सरकारने आता ग्रीन सिग्नल दिला आहे.

गुड न्यूज ः तलाठी भरतीला सरकारचा ग्रीन सिग्नल, नगरसाठी वेगळा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोनाने गती घेऊ पाहणारे अर्थचक्र रोखून धरले. याचा शेतकऱ्यांसह सर्वच उद्योगांना फटका बसला. सरकारनेही आपल्या सर्वच विभागातील नोकर भरती स्थगित केली. त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांचा हिरमोड झाला. परंतु सरकारने आता अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येऊ पहात आहे.

महाविकास आघाडी सरकारनेही नोकर भरतीसंदर्भात उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, सरकारची आर्थिक स्थिती नाजूक होती. त्यामुळे काही कालावधीसाठी ती स्थगित केली होती. वित्त विभागाने 4 मे 2020 शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये, असे सांगितले होते.

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात होती.

हेही वाचा - साई संस्थानची झोळी झाली रिकामी

कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ हे जिल्हे, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे, पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पदभरतीची प्रक्रिया पूर्ण झाली होती.

ज्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तेथे उमेदवारांना नियुक्ती पत्र न देण्याचे आदेश होते. सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने संबंधित उमेदवारांच्या नोकरीतील अडथळा दूर झाला आहे. मात्र, यात नगरचा अपवाद आहे. अहमदनगर जिल्ह्याबाबत लवकरच स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार आहे. तलाठी गट क संवर्गातील भरती करण्यास संबंधित जिल्ह्याची जिल्हा निवड समिती सक्षम प्राधिकारी म्हणून काम करील.

संपादन - अशोक निंबाळकर