आम्‍ही बांगड्या भरल्या नाहीत ; गुलाबराव पाटील

भाजप नेत्‍यांना मंत्री गुलाबराव पाटील यांचा इशारा; घोडेगाव रुग्णालयाचे उद्‍घाटन
Gulabrao Patil
Gulabrao Patilsakal

सोनई : केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून सध्या फक्त महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या चौकशा सुरू आहेत. भारतीय जनता पक्षातील सारेच नेते जणू महामंडलेश्वर असल्याप्रमाणे वागत शिवसेनेला लक्ष्य करणार असतील, तर आम्ही बांगड्या घालून स्वस्थ बसणार नाही, असा इशारा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

घोडेगाव (ता. नेवासे) येथे नऊ कोटी ३५ लाख रुपये खर्चून बांधलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे उद्‌घाटन करण्यापूर्वी शनिदर्शन भेटीत ते ''सकाळ''शी बोलत होते. घोडेगाव येथील कार्यक्रमात मंत्री पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून रुग्णालयाचे उद्‌घाटन झाले. घोडेगाव पाणीयोजनेसाठी ४४ कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली. आंबराई विश्रामगृह येथे झालेल्या शिवसंवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश कार्ले यांनी केले. मान्यवरांचा सत्कार रावसाहेब कांगुणे, डॉ. शिवाजी शिंदे, मच्छिंद्र म्हस्के, हरिभाऊ शेळके यांनी केला. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे उपस्थित होते.

जलसंधारणमंत्र्यांनी राबविलेल्या शिवसंवाद व घोंगडी बैठकीची माहिती देऊन, जलसंधारण, दळणवळण व आरोग्यमंदिराचे काम करताना संघटनावाढीला अग्रक्रम दिला जाईल, असे सांगितले. त्यांनी जिल्ह्यातील अकराशे बंधा-यांसाठी २५० कोटींचा निधी मंजूर केल्याचे सांगितले. शिवसंवादामध्ये मंत्री पाटील यांनी पक्ष वाढण्यासाठी मार्गदर्शन केले. नेवासे तालुक्यासह जिल्ह्यात नळ पाणीपुरवठा योजनेला निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत त्यांनी आपल्या भाषणाला अस्सल खानदेशी तडका देऊन उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या.

भाजपची साडेसाती हटू दे; शनिदेवाला साकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्राचा केलेला अपमान प्रत्येकाच्या जिव्हारी लागणारा आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केल्यानेच पहिल्या पाचमध्ये राज्याचे नाव आहे असे सांगून त्यांनी, चांगल्या कामाला भाजपची लागलेली साडेसाती हटू दे, अशी प्रार्थना शनिदेवाला केल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com