नगरमध्ये मुसळधार...१०३ मिलिमीटर पाऊस, सीना दुथडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

आजही दुपारपासून आकाशात ढग जमा झाले आणि पावणेचारच्या सुमारास आलेल्या पावसाने शहर परिसराला तासभर झोडपून काढले.

नगर : गेल्या पाच दिवसांपासून नगर शहर व परिसरात पाऊस हजेरी लावत आहे. काल रात्री झालेल्या दमदार पावसाने नगर शहर झोडपून काढले. शहरासह तालुक्यात आज सकाळपर्यंत 103 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आजही दुपारपासून आकाशात ढग जमा झाले आणि पावणेचारच्या सुमारास आलेल्या पावसाने शहर परिसराला तासभर झोडपून काढले. पावसामुळे फेरीवाले व छोट्या व्यावसायिकांची चांगलीच धावपळ झाली. महापालिका प्रशासनाने शहरात पावसाचे पाणी साचणार नाही.

हेही वाचा - दरोड्याच्या घटनेचा चोवीस तासांत तपास

या बाबत विशेष दक्षता घेतल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत शहरात कोठेही पाणी साचल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे आलेली नाही.

शहरातील नीलक्रांती चौक ते न्यू आर्टस कॉलेजपर्यंतचा रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा झाल्या तरीही रस्त्याच्या कडेच्या नालीचे काम न झाल्याने पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. मात्र, शहरातील सखल भागांत पाणी जमा झाले होते. नालेगाव, अमरधाम रस्ता, लक्ष्मी कारंजा, पटवर्धन चौक, जुना टिळक रस्ता, कोठला, सर्जेपुरा, तेली खुंट, बोल्हेगावातील गणेश चौक परिसर आदी भागांत पावसाचे पाणी साचले होते. 

सलग पाच दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे सीना नदीला आज पुन्हा पूर आला होता. सकाळी काटवन खंडोबा रस्त्यावरील पुलावर नदीचे पाणी आले होते. नगर-कल्याण रस्त्यावरील सीना नदीपुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती.

आयएमएस कॉलेजसमोर नालेसफाई न झाल्याने नगर-औरंगाबाद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. नगर तालुक्‍यात नालेगाव, सावेडी, जेऊर, कापूरवाडी, भिंगार, चिचोंडी पाटील, रुईछत्तिशी, भिंगार, केडगाव, चास, वाळकी या मंडलांत दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Ahmednagar