esakal | हवाई हल्ल्यात सर्व सहकारी मारले गेले अन्‌ अण्णा हजारे जखमी झाले, पुढे त्यांनी...
sakal

बोलून बातमी शोधा

An informative article on social activist Anna Hazare

सरकार कोणाचेही असो एखाद्या निर्णयाविरुद्ध अण्णा हजारे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. विविध कायद्यांसाठी त्यांनी ‘उपोषणे’ केली. या आंदोलनची दखल केंद्र व राज्य सरकारला घ्यावी लागली आहे.

हवाई हल्ल्यात सर्व सहकारी मारले गेले अन्‌ अण्णा हजारे जखमी झाले, पुढे त्यांनी...

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : सरकार कोणाचेही असो एखाद्या निर्णयाविरुद्ध अण्णा हजारे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. विविध कायद्यांसाठी त्यांनी ‘उपोषणे’ केली. या आंदोलनची दखल केंद्र व राज्य सरकारला घ्यावी लागली आहे. नुकतीच ग्रामपंचायतीवर होणाऱ्या प्रशासननियुक्तीबाबतही त्यांनी भूमिका जाहीर केली होती. अण्णा हजारेंबद्दलची अनेकांनी पूर्ण माहिती नसेल, याचाच थोडक्यात घेतलेला हा आढावा...

अण्णा हजारे भारतीय जनआंदोलन चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांचे मूळ नाव किसन बाबुराव हजारे आहे. पण अण्णा हजारे या नावानेच ते परिचित आहे. महाराष्ट्रातील भिंगार (जि. अहमदनगर) या गावी बाबुराव व लक्ष्मीबाई या दांपत्यापोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा सैन्यात होते. वडील भिंगारमधील एका औषधालयात नोकरीला होते. पुढे ते नोकरी सोडून अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी या आपल्या मूळ गावी आले. सात मुलांचा गोतावळा सांभाळताना ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे अण्णा मुंबईला आत्याकडे गेले. तेथे सातवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते फुलांच्या दुकानात काम करू लागले. नंतर त्यांनी स्वतःचे फुलांचे दुकान काढले पण फारसा जम बसेना म्हणून ते सैन्यात वाहनचालक म्हणून दाखल झाले.

भारत- पाकिस्तान युद्धा दरम्यान खेमकरण येथील हवाई हल्ल्यात त्यांच्या यूनिटमधील सर्व सहकारी मारले गेले तथापि अण्णा हजारे किरकोळ जखमी झाले. पुढे आपल्या गावाची दैन्यावस्था पाहून त्यांनी सैनिकी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. गावाकडील शेतकऱ्यांच्या व्यथा, पाण्याचे दुर्भिक्ष, सरकारी कार्यायात होणारे गैरव्यहवार यामुळे अण्णा हजारे अस्वस्थ झाले. त्यांना आत्महत्या करावी, असे वाटे पण विवेकानंदांच्या ‘कॉलिंग टू द यूथ फॉर नेशन’ या ग्रंथामुळे त्यांना नवचैतन्य मिळाले. 

स्वतः ची शेतजमीन त्यांनी गावातील शाळेच्या वसतिगृहासाठी दिली. निवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम त्यांनी गावातील यादवबाबा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरून गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला. गावाच्या सामाजिक परिवर्तनासाठी, गावातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी दारूबंदीचा कार्यक्रम यशस्वी रीत्या त्यांनी हाताळला. 
पाण्यासाठी श्रमदानातून तलाव, कालवे उभारले. वनीकरण, स्वच्छता अभियान, कुर्‍हाडबंदी, पारदर्शी प्रशासन, आर्थिक स्वावलंबन या उपक्रमांमुळे अल्पावधीतच राळेगणसिद्धी हे राज्यात आदर्श गाव ठरले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील अनेक गावात ग्रामविकासाच्या योजना राबविल्या. महाराष्ट्र सरकारच्या आदर्श गाव प्रकल्प समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

सामाजिक परिवर्तनाबरोबरच गैरव्यहवार करणारे राजकारणी व प्रशासन यांच्याविरुद्ध अण्णांनी जनआंदोलन छेडले. त्यांनी कार्यकर्त्यांची फळी उभी केली. राज्यात व्यापक चळवळ सुरू केली. प्रशासकीय कामकाजाची माहिती सामान्य लोकांना मिळावी, प्रशासनिक कामात पारदर्शकता असावी यांसाठी त्यांनी माहितीचा अधिकार, ग्रामसभांचे सक्षमीकरण, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा यांसंदर्भात प्रदीर्घ संघर्ष केला. त्यांच्या अंमलबजावणीसाठी उपोषण, मोर्चा, आंदोलन या मार्गांचा अवलंब केला. 
माहितीच्या अधिकारासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर १२ दिवस उपोषण केले. त्यामुळे ‘माहितीचा अधिकार’ प्रथम महाराष्ट्रात व नंतर देशात संमत झाला. त्यांच्या जनआंदोलनामुळे अनेक मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. याबरोबर अधिकाऱ्यांवर कारवाईही झाली.

गैरव्यहवारमुक्तीसाठी जनलोकपाल विधेयक आवश्यक असल्याची भूमिका अण्णा हजारे यांनी घेतली. या प्रलंबित विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी दिल्ली येथील जंतर- मंतर मैदानावर एफ्रिल २०११ मध्ये उपोषण केले. त्याला देशभरातून पाठिंबा मिळाला. हे आंदोलन जागतिक स्तरावरही लक्षवेधी ठरले.

जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी त्यांनी राळेगणसिद्धी येथे १० डिसेंबर २०१३ पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. १७ डिसेंबर २०१३ रोजी राज्यसभेत व १८ डिसेंबर २०१३ रोजी लोकसभेत विधेयक मंजूर झाले.  त्यांच्या कामामुळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळले आहेत.
(स्त्रोत : मराठी विश्‍वकोष)