
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे प्रादेशिक फळसंशोधन केंद्र काटोल येथील 'काटोल गोल्ड ' या सुधारित मोसंबी वानाची प्रत्यक्ष शेतावर जाऊन हे प्रशिक्षणार्थी शेतकरी माहिती घेणार आहेत .
जामखेड : कर्जत-जामखेड तालुक्यातील लिंबूवर्गीय पिकांमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी,
या क्षेत्रातील नवनवीन प्रयोग पाहायला मिळावेत व उत्पादकता वाढवी, आर्थिक स्तर उंचावा याकरिता आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही तालुक्यातील तीस शेतकऱ्यांना तीन दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी नागपूरला पाठविले आहे.
हेही वाचा - एकदाच लागवड खर्च, मग फक्त नोटा छापायच्या
यापूर्वी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील शरद ढवळे या शेतकर्यासह बारामती कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी तीन दिवसीय अभ्यास दौरा करुन संत्रा, मोसंबी व लिंबू पिकात केलेल्या नवीन प्रयोगांची पाहणी केली होती. त्यानंतरच या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना या अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात आले आहे.
या अभ्यास दौऱ्या दरम्यान मिळणाऱ्या ज्ञानाचा फायदा दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना व्हावा ; या भागातील लिंबूवर्गीय पिकाचे उत्पादन अधिकचे वाढावे ; शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळावेत; हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमदार रोहित पवार सातत्याने नवनवीन उपक्रम राबवित आहेत. त्यांना वडील राजेंद्र पवार यांची साथ मिळत आहे.
अभ्यास दौऱ्यावर शेतकऱ्यांना पाठविण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग त्यांनी हाती घेतला आणि दोन्ही तालुक्यातून तीस शेतकऱ्यांना पाठवले .दोन्ही तालुक्यातून असा अभ्यास दौरा पहिल्यांदाच होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह , जिज्ञासा, कुतूहल पाहायला मिळाले. निश्चितपणे या दौऱ्याची 'फलश्रुती' दोन्ही तालुक्यातील मोसंबी, लिंबू , संत्रा पिकांचा दर्जा उंचावण्यासाठी होईल.
अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशन , कृषी विभाग यांच्या संकल्पनेतून आमदार रोहित पवारांच्या पुढाकारातून आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबूवर्गीय पीक घेणाऱ्या शेतकर्यांचा अभ्यास दौरा नागपूरकडे रवाना झाला आहे .
तीन दिवसाच्या या अभ्यास दौऱ्यामध्ये शेतकरी विविध प्रकारचे तंत्रज्ञान अवगत करणार आहेत.दौऱ्याच्या पहिल्या दिवशी हे प्रशिक्षणार्थी शेतकरी नागपूर येथील राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्रामध्ये हे शेतकरी पोहोचणार आहेत .येथे राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्राची चित्रफित पहूण संचालक डॉक्टर एस. एम.लाडानी यांचे मार्गदर्शन घेणार आहेत.
तद्नंतर रोगविरहित विषाणू विरहित आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या लिंबू ,संत्रा , मोसंबी रोपांची निर्मिती व रोपवाटिका 'मात्रवृक्ष' बागेची पाहणी करणार आहेत. यावेळी त्यांना डॉ. बिपिन चंद्र महाल यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
प्रशिक्षणार्थी शेतकरी प्रत्यक्ष शेतावर लिंबू ,संत्रा ,मोसंबी पिकांची आधुनिक लागवड पद्धतीची पाहणी व चर्चा करणार आहेत. मोसंबी, संत्रा,लिंबू या नवीन वानाच्या फळांचे निरीक्षण करून वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोनकर यांचे मार्गदर्शन घेणार आहेत.
दरम्यान रुंद गादीवाफा पद्धतीवरही याठिकाणी चर्चासत्र होणार आहे. लिंबूवर्गीय पिकावरील विविध रोग व कीड यांच्या एकत्रित नियंत्रण कसे करावे यासंदर्भातही डॉ. सोनकर मार्गदर्शन करणार आहेत.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे प्रादेशिक फळसंशोधन केंद्र काटोल येथील 'काटोल गोल्ड ' या सुधारित मोसंबी वानाची प्रत्यक्ष शेतावर जाऊन हे प्रशिक्षणार्थी शेतकरी माहिती घेणार आहेत .
यांत्रिकीकरणाचा बाग छाटणी साठी उपयोग याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहणी शेतकरी करणार आहेत. रोगमुक्त रोपवाटिकेची पाहणी करून डॉ. योगेश धार्मिक, प्रा. डॉ. एकता बागडे , डॉ .पोटे यांच्याबरोबरही हे प्रशिक्षणार्थी शेतकरी चर्चा करणार आहेत. प्रयोगशील शेतकरी निखील घरे यांच्या एकशे वीस एकरावरील इस्राईल पद्धतीने लागवड केलेल्या संत्रा बागेला हे प्रशिक्षणार्थी शेतकरी भेट देऊन पाहणी करणार आहेत व त्यांच्या समवेत चर्चा करणार आहेत .
संपादन - अशोक निंबाळकर