मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी केली सात जणांची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Killed seven people avenge death child

भीमा नदी पात्रात बुधवारपासून ( ता.१८ ) टप्प्याटप्याने सात मृतदेह आढळून आले होते. सातही जण एकाच कुटुंबातील होते. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती.

Murder Case : मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी केली सात जणांची हत्या

केडगाव : पारगाव ( ता.दौंड ) येथील भीमा नदी पात्रात मृत अवस्थेत सापडलेल्या सात जणांची आत्महत्या नसून त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज यवत येथे पत्रकार परिषदेत दिली. पाच सख्या भावंडांनी हे हत्याकांड केले आहे. आरोपीत एका महिलेचा समावेश आहे.

भीमा नदी पात्रात बुधवारपासून ( ता.१८ ) टप्प्याटप्याने सात मृतदेह आढळून आले होते. सातही जण एकाच कुटुंबातील होते. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची पाच पथके कार्यरत होती. काही पुराव्यांच्या आधारे ही आत्महत्या नसून खून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी विविध ठिकाणांवरून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

अशोक कल्याण पवार ( वय ६९ ), शाम कल्याण पवार ( वय ३५ ), शंकर कल्याण पवार ( वय ३७ ) प्रकाश कल्याण पवार ( वय २४ ), आरोपींची बहिण कांताबाई सर्जेराव जाधव ( वय ४५ सर्व रा. ढवळेमळा, निघोज, ता. पारनेर, जि.नगर ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोहन उत्तम पवार ( वय ४५ ) संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार ( वय ४० दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड) शाम पंडीत फुलवरे ( वय २८ ), राणी शाम फुलवरे ( वय २४ ) रितेश उर्फ भैय्या ( वय ७ ), छोटू शाम फुलवरे ( वय ५ ) कृष्णा शाम फुलवरे ( वय ३, चौघेही रा. हातोला, ता. वाशी, जि.उस्मानाबाद ) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

मोहन पवार हे शाम फुलवरे यांचे सासरे आहेत. अनैतिक संबंध किंवा अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे. आरोपी व मयत मोहन पवार हे चुलत भाऊ आहेत. पवार व फुलवरे या दाम्पत्यांचा यवत येथे काल अंत्यविधी करण्यात आला. आरोपी व मयत सर्वजण निघोज ( ता.पारनेर ) येथे राहत होते. तेथे ते मजुरी काम करत असत.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अशोक पवार, याचा मुलगा धनंजय पवार याचा काही महिन्यांपुर्वी वाघोली येथे अपघातात मृत्यू झाला होता. या मृत्यूस मयत मोहन पवार व त्याचा मुलगा अनिल पवार कारणीभूत असल्याचा संशय आरोपींना होता. धनंजयच्या मृत्यूचा राग आरोपींच्या डोक्यात होता.

या कारणावरून सुड घेण्याच्या उद्देशाने आरोपींनी मोहन पवार व त्यांच्या कुटुंबियांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत आणखी काही उद्देश आहे का, कट कसा रचला, कुठे रचला याबाबत आम्ही तपास करत आहे. अशी माहिती अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलिस निरीक्षक अविनाश शिळिमकर आदी उपस्थित होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस पुढील तपास करत आहे.