श्रीगोंद्यात लिंबूखरेदी बंद; शेतकऱ्यांचे हाल, संभाजी ब्रिगेड धरणार धरणे

Lemon purchase stopped in Shrigonda
Lemon purchase stopped in Shrigonda

श्रीगोंदे : तालुक्‍यात लिंबांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असताना दर घसरले. यात व्यापाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेड व तरुण शेतकऱ्यांनी लिलावाची मागणी केली. मात्र, कोरोना संकटात लिंबांचे लिलाव करू शकत नसल्याचे सांगत व्यापारी ठाम राहिले.

दरवाढीचा दबाव वाढत गेल्याने, व्यापाऱ्यांनी आजपासून लिंबूखरेदीच बंद केली. याविरोधात आता उद्या (सोमवारी) संभाजी ब्रिगेडतर्फे बाजार समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, पूर्वीप्रमाणे परवानगी मिळाल्यास पुन्हा लिंबूखरेदी सुरू करण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दाखविली आहे. 

महिन्यापूर्वी लिंबांच्या दराबाबत तोंडावर बोट ठेवणारे नेतेही आता शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे बोलत आहेत. त्यात तरुण शेतकऱ्यांनी उडी घेतल्याने लिंबूदराचा विषय चिघळला. दरम्यान, आजपासून व्यापाऱ्यांनी वजनकाटे बंद करीत लिंबूखरेदी थांबविली. त्यासाठी कोरोना व गर्दीचे कारण दिले आहे. याच प्रश्नी उद्या (सोमवारी) संभाजी ब्रिगेड आंदोलन करीत आहे. 

ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस म्हणाले, ""व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. बाजार समितीने दोन वर्षे लिंबांचे लिलाव केले नाहीत. आता दर पाडून व्यापारी लुटत आहेत. त्यामुळे लिलाव करून तोच दर तालुक्‍यातील लिंबूखरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला बंधनकारक करण्याची मागणी आहे. कायद्यानुसार शेतकऱ्यांचे नुकसान व्यापाऱ्यांकडून वसूल करावे.'' 

व्यापारी संचालक उमेश पोटे म्हणाले, ""कोरोना संकटात गर्दी होत असल्याने आम्ही लिलाव करीत नाही. लिलाव केले तरी ते दरही स्थानिक व्यापारी शहरातील स्थिती पाहून ठरवितात. लिलाव नाही झाले तरी दर ठरविणारे आम्हीच आहोत. शेतकऱ्यांवर अन्याय होत नाही. यापूर्वीप्रमाणे गावात वजनकाटे लावून खरेदीस आमची तयारी आहे.'' 

लिंबूव्यापारी, शेतकरी प्रतिनिधींची पुन्हा एकदा बैठक घेऊन चर्चेतून हा विषय निकाली काढू. दोन्ही बाजू समजून घेऊन अधिकारी, संचालक मंडळाच्या सूचनेनुसार वाद मिटवू. शेतकरी व व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न समिती करीत आहे. 
- संपत शिर्के, उपसचिव, बाजार समिती, श्रीगोंदे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com