नगरच्या मातीत लोकमान्य टिळकांनी केली होती मोठी घोषणा

अशोक मुरुमकर
Friday, 6 November 2020

पूर्वीपासून राजकारण, समाजकारण व अर्थकारणातील अनेक महत्ताच्या घडामोडीमध्ये नगर जिल्हा नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला आहे.

अहमदनगर : पूर्वीपासून राजकारण, समाजकारण व अर्थकारणातील अनेक महत्ताच्या घडामोडीमध्ये नगर जिल्हा नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला आहे. मध्ययुगीन इतिहासातील अनेक रत्नांचा उद्य या जिल्ह्यात झाल्याचे दाखले आहेत. हा जिल्हा विविध कारणांनी चर्चेत असतो. अभ्यासक्रमाच्या पुस्तकातही या जिल्ह्याचे दाखले आहेत.
 

क्षेत्रफळाच्या दृष्टीने नगर जिल्हा महाराष्ट्रात सार्वात मोठा म्हणून ओळखला जातो. निजामशाही ते पेशवाईतील अनेक घटना नगर जिल्ह्यात घडल्या आहेत. पेशवाईच्या शेवटाबरोबरच लॉर्ड वेलस्ली या प्रशासकाने कब्जा करुन प्रशासनाच्या सोईसाठी अहमदनगर जिल्हा निर्माण केला.

देशात ॲनी बेझेंट यांनी होमरुळ चळवळ सुरु केली. त्याला लोकमान्य टिळकांनी पाठिंबा दिला होता. त्याच्या जनजागृतीसाठी टिळक यांनी नगर जिल्ह्यात सभा घेतली होती. आणि या सभेतच ‘स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी घोषणा केली होती.

हेही वाचा : इंग्रज पंडीत नेहरुंना तुरुंगातही पुरवायचे साबण, बेड मच्छरदाणी

नगर जिल्ह्यात अनेक एैतिहासिक घटनाही घडल्याच्या नोंदी आहेत. येथील भुईकोट किल्ल्यालाही सुमारे ५०० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. मोगलांच्या काळापासून या किल्ल्याचा वापर राजघराण्यातील लोकांना व राजकीय नेत्यांना बंदी ठेवण्यासाठी केला जात होता. महाराणी येसूबाई व त्यांची मुलगी भवानीबाई यांना याच किल्ल्यात बंदी करून ठेवले होते. इंग्रजांविरूद्ध मोठा रणसंगर सुरू झाला होता. १९४२ ची चले जाव चळवळ जोर धरीत होती. तिचे नेतृत्व करणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांना बंदी म्हणून ठेवले होते. नेहरु यांनी याच किल्ल्यात ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’नावाचा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला.
 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगरमधील भुईकोट किल्ला १४९० मध्ये बांधल्याचा उल्लेख सापडतो. किल्ल्याभोवती बांधलेला तट मातीचा होता. नंतर १५६० मध्ये या किल्ल्याचे पक्के बांधकाम करण्यात आले. मोगलांच्या काळापासून या किल्ल्यात राजकीय बंदी ठेवण्यात येऊ लागले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजे १९४२ ते १९४५ या कालावधीत पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, नरेंद्र राव यांच्यासह इतर १२ नेत्यांना ‘चले जाव’आंदोलनात येथे बंदीवासात ठेवण्यात आले होते. यावेळी बंदीवासात असताना पंडित नेहरु यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडीया’ हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला.
 

१९४२ मध्ये मुंबईत काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी जोरदार भाषण केले. त्यावेळी ‘करा वा मरा’चा नारा दिला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी नेहरूंसह प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली.
 

डिस्कव्हरी ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा शोध हा त्यांचा ग्रंथ मोठा ऐतिहासिक दस्तावेज मानला जातो. परंतु या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख आल्याने त्यांना राजकीय रोषाला सामोरे जावं लागलं होतं. नेहरू यांची सेवा करण्यासाठी राघो जंजिरे नावाचा कैदी होता. बंदी काळात त्याने नेहरूंची सेवा केली. नगरच्या स्वातंत्र्यसैनिकांना राजकीय पुढाऱ्यांना कैद केल्याची माहिती नव्हती. परंतु ही माहिती समजताच बाहेरही मोठ्या संग्रामाची तयारी सुरू झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lokmanya Tilak had made a big announcement in the Nagar soil