तब्बल 240 वर्षे अज्ञातवासात राहिलेल्या पूर्वजांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शनाने अंगावर काटा फुलला

आनंद गायकवाड 
Saturday, 21 November 2020

देशमुख म्हणाले, संगमनेर तालुक्यातील अंभोरकर देशमुख यांच्या घराण्यातील भवानाबाईंचा विवाह पेशवाईत आपल्या कर्तृत्वाने मराठेशाहीचा झेंडा अटकेपार रोवण्यात मोलाचा वाटा असलेले ग्वाल्हेरचे महादजी शिंदे यांच्याशी संगमनेरात 23 डिसेंबर 1777 रोजी झाला होता. या त्यांच्या चौथ्या पत्नी होत्या. त्या भवानीमाता व देशमुख परिवाराचे अध्यात्मिक गुरु भवानीबाबांच्या निस्सीम भक्त होत्या. विवाहानंतर त्यांनी सासरी न जाता संगमनेरलाच राहणे पसंद केले.

संगमनेर (अहमदनगर) : पिढ्यानपिढ्या आमच्या घराण्यातील कर्तृत्ववान स्त्री भवानीबाईबद्दलच्या चर्चा लहानपणापासून कानावर पडत होत्या. मात्र तिच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती. मात्र मंगळवारी प्रत्यक्ष समाधीस्थळाचे दर्शन घेताना, मनात असंख्य भावभावनांचा कल्लोळ माजून अंगावर शहारा आला होता. 240 वर्षांपूर्वी मृत झालेल्या भवानीबाईंच्या स्मृतीस्थळाचा, गेल्या कित्येक वर्षांचा आमचा शोध पूर्ण झाल्याची व हा एक अविस्मरणीय प्रसंग असल्याची प्रतिक्रिया महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यातील नगरसुल येथील एका शेतातील समाधीस्थळी भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

 हे ही वाचा : सरकार फेरआढावा घेत नसल्याने जनहिताच्या योजना कागदावरच : अण्णा हजारे

देशमुख म्हणाले, संगमनेर तालुक्यातील अंभोरकर देशमुख यांच्या घराण्यातील भवानाबाईंचा विवाह पेशवाईत आपल्या कर्तृत्वाने मराठेशाहीचा झेंडा अटकेपार रोवण्यात मोलाचा वाटा असलेले ग्वाल्हेरचे महादजी शिंदे यांच्याशी संगमनेरात 23 डिसेंबर 1777 रोजी झाला होता. या त्यांच्या चौथ्या पत्नी होत्या. त्या भवानीमाता व देशमुख परिवाराचे अध्यात्मिक गुरु भवानीबाबांच्या निस्सीम भक्त होत्या. विवाहानंतर त्यांनी सासरी न जाता संगमनेरलाच राहणे पसंद केले. महादजी शिंदे पुण्याहून ग्वाल्हेरला जाताना व येताना संगमनेरात थांबत. 1780 मध्ये महादजींनी भवानीबाईंना त्यांच्या इच्छेविरुध्द आग्रहाने ग्वाल्हेरला घेवून जाण्याचा प्रयत्न केला. 

संगमनेरहून कोपरगावमार्गे पुढे निघाल्यावर हा लवाजमा नगरसुल येथे मुक्कामाला थांबला असता भवानीबाईंनी बोटातल्या अंगठीतील हिरा गिळून देहत्याग केला होता. ही माहिती अंभोरकर देशमुख परिवाराकडे होती. मात्र नगरसुल येथे अशी समाधी कुठे आहे, याबाबत माहिती मिळत नव्हती.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर यांनी समाजमाध्यमांवर संगमनेरच्या इतिहासावर विविध लेख लिहीले होते. ते वाचून नगरसुलचे इतिहास अभ्यासक विनोद पाटील यांनी खेडलेकर यांच्याशी संपर्क साधून या समाधीबाबत माहिती दिली होती. काल रणजितसिंह देशमुख यांनी खेडलेकरांसमवेत त्या ठिकाणी भेट दिली. नगरसुल गावाबाहेरील संजय खैरनार यांच्या शेतात त्यांच्या मुळ समाधीवर भवानीमातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन, छोटेसे मंदिर बांधलेले आढळले. 

 हे ही वाचा : अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

एका राज्याच्या राणीने या शेतात राजाचा मुक्काम असताना हिरा गिळल्याची कथा या परिसरात प्रचलित आहे. इतिहासाच्या अंधार्‍या गुहेत भटकंती करताना उजेडात आलेल्या अशा शोधाचा आनंद शब्दात सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. खेडलेकर यांनी दिली. यावेळी नगरसुलचे इतिहास अभ्यासक विनोद पाटील, महानंदचे संचालक सुभाष निकम, पिंपरणे येथील नवनीत देशमुख, अजित देशमुख आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahananda president Ranjit Singh Deshmukh said that he was very satisfied with the visit to the ancestral memorial