कोरोना मैदानातील कोपरगावचे सेनापती; लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये योग्य समन्वय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

कोरोना बचावासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनात योग्य समन्वय, अंत्योदय योजनेतील नागरिकांना मुबलक अन्नधान्य पुरवठा करणारे.

अहमदनगर : कोरोना बचावासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनात योग्य समन्वय, अंत्योदय योजनेतील नागरिकांना मुबलक अन्नधान्य पुरवठा करणारे, शहरात सोडियम हायपोक्‍लोराईड फवारणी, शिवभोजन थाळी, एसएसजीएम महाविद्यालय येथे कोविड सेंटर, अत्याधुनिक सोयींनी युक्त 16 बेडच्या ग्रामीण रुग्णालयाची तातडीने उभारणी, पीपीई किटसह मास्कवाटप, जिल्ह्यात सर्वप्रथम सॅनिटायझरचे उत्पादन करणारा काळे कारखाना, अशा अनेक कामांची आघाडी घेत, समाजात मिसळून समस्यांवर मात करणारे, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' संकल्पनेतून तालुक्‍यासाठी दिवस-रात्र झटणारे आमदार आशुतोष काळे खऱ्या अर्थाने कोपरगावचे कोरोना सेनापती ठरले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा वेळी तालुक्‍यातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने तहसीलदार योगेश चंद्रे, आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ. संतोष विधाते, डॉ. वैशाली बडदे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी दिलीप सोनकुचळे, पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलिस निरीक्षक अनिल कटके, स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सर्व शासकीय कार्यालये व वर्दळीच्या ठिकाणी सोडियम हायपोक्‍लोराईड सोल्यूशनची फवारणी करण्याच्या सूचना केल्या.

प्रभावीपणे राबविलेल्या उपाययोजना, प्रशासनाने केलेले नियोजन व नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाच्या जोरावर तालुका कोरोनाला रोखण्यात यशस्वी झाला. शहरात नियम-अटी घालून छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसायदेखील सुरू केले. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा योग्य मेळ कसा असावा, हे कोपरगावचे आदर्श उदाहरण राज्यात आमदार काळे यांनी दाखवून दिले. तालुक्‍यात 10 एप्रिल रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. तोच शिंगणापूर येथील एक महिला सारीसदृश आजाराने बाधित असल्याचे समोर आले. एकाच वेळी ही दोन संकटे उभी ठाकली. त्या वेळी आमदार काळे यांनी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन उपाययोजनांची आखणी केली. तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्यापूर्वीच संपूर्ण मतदारसंघातील वाड्या-वस्त्यांमध्ये सोडियम हायड्रोक्‍लोराईडची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. 

शासकीय कार्यालयात फ्लोअर क्‍लिनिंग व वर्दळीच्या ठिकाणी औषधफवारणी, आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई कीट व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले. महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट, साईबाबा तपोभूमी, कोपरगाव यांच्यातर्फे रोज 500 कुटुंबीयांची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. कोरोना काळात डॉक्‍टर बाधित होत असल्याने, आरोग्य विभागदेखील भयभीत झाला. त्या वेळी रुग्णांची नियमित तपासणी करण्यासाठी डॉक्‍टर वेळेवर उपलब्ध होत नव्हते. अशा वेळी आमदार काळे यांनी गरजू रुग्णांसाठी प्रख्यात हृदयरोग, अस्थिरोग, बालरोग, स्त्रीरोग असे तीस तज्ज्ञ डॉक्‍टरांची मोफत सेवा फोनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. कम्युनिटी क्‍लिनिक सुरू करून, नामवंत डॉक्‍टरांकडून मोफत वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून दिला.

अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटुंबांना रेशनवर गहू, तांदूळ मोफत देऊन, हे धान्य प्रत्येक गरजूपर्यंत पोचते का नाही, याची वेळोवेळी स्वतः रेशन दुकानात जाऊन खात्री केली. सर्व ग्रामपंचायतींसह शहरातील 17 हजार कुटुंबांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हॅंड सॅनिटायझर मोफत दिले. आशा सेविकांच्या माध्यमातून आणि कोपरगाव नगरपरिषद व स्वतःच्या यंत्रणेच्या मदतीने प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची तपासणी केली.

डॉक्‍टर, आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा सेविकांना 500 पीपीई किट, 3000 एन-95 मास्क, 3000 ट्रिपल लेअर मास्क, 42 इन्फ्रारेड थर्मामीटर, तपासणी करताना अचूक निदान व्हावे, यासाठी 50 ऑक्‍सिमीटर, हॅंड सॅनिटायझर व पोलिसांसाठी 100 फेस शील्ड मास्क दिले. कोपरगाव नगरपरिषदेला 20 पीपीई किट, 100 डिस्पोजेबल कॅप, 100 डिस्पोजेबल ग्लोव्ह्‌ज, 100 एन-95 मास्क, 100 फेस शील्ड देऊन शहरातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली. कोणीच उपाशी राहू नये, यासाठी कोपरगावात शिवभोजन थाळी सुरू केली. कोपरगाव येथे 100 बेडचे कोविड केअर सेंटर उभारले. 

पायी निघालेल्या परप्रांतीय नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने वाहनव्यवस्था उपलब्ध करून मास्क, पाणी व नाश्‍ता पाकिटे देऊन, अनोख्या माणुसकीचे दर्शन घडविले. गंभीर रुग्णांवर कोपरगावमध्येच उपचार व्हावेत, यासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये 20 बेडचे अद्ययावत कोविड हेल्थ सेंटर उभारले. सूक्ष्म नियोजन व बुद्धिकौशल्याच्या जोरावर कोरोनाच्या लढाईत वर्चस्व मिळवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली ती तालुक्‍याचे आमदार आशुतोष काळे यांनी. 

याव्यतिरिक्त कोपरगाव तालुका औद्योगिक वसाहतीच्या उद्योजकांतर्फे परप्रांतीय वाटसरूंना जेवणाची व नाश्‍त्याची पाकिटे मोफत वाटण्यात आली. महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचा "समता परिवार' व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट्‌स असोसिएशनतर्फे अडीच महिने 700 ते 800 गरजूंना डबे, सर्वसामान्य नागरिक व रिक्षाचालक यांना मोफत किराणा किट, अक्षयतृतीयेच्या दिवशी तब्बल 900 जणांना पुरणपोळीचे जेवण पुरविले. लायन्स, लायनेस व लिओ क्‍लबतर्फे एक हजार किराणा किटचे वाटप करण्यात आले. साईगाव पालखी व मुंबादेवी तरुण मंडळातर्फे रोज एक हजार गरजूंना जेवण पुरविण्यात आले. यासह छोट्या-मोठ्या अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींनी कोरोना योद्‌ध्याची भूमिका पार पाडली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Kale story regarding Corona in Koporgaon