वाद्याच्या गजरात एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी दुमदुमले तहसील कार्यालयाचे आवार

आनंद गायकवाड
Monday, 5 October 2020

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने विविध प्रकारची आंदोलने सुरु आहेत.

संगमनेर (अहमदनगर) : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने विविध प्रकारची आंदोलने सुरु आहेत. या अंतर्गत आज संगमनेरातील तहसील कार्यालयाच्या आवारात सवाद्य ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वाद्यांच्या गदारोळात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. 

नगर जिल्ह्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या वेळी बोलताना निर्मला गुंजाळ म्हणाल्या, क्रिकेटच्या मैदानावर धावा करताना, कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या खेळाडूवर सवलतींचा वर्षाव होतो मात्र, एका बांधावरुन दुसऱ्या बांधावर उन्हातान्हाची पर्वा न करता धावणाऱ्या, पोटासाठी राबणाऱ्या, जगाच्या पोशिंद्याची मात्र सरकार उपेक्षाच करते आहे. सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.

1992 सालापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरु असूनही, अद्याप हा तिढा सुटला नाही. मागील वर्षी लाखोंच्या संख्येने तरीही शांतता व शिस्तब्ध पध्दतीने निघालेल्या 58 मोर्चांची जागतिक पातळीवरही दखल घेतली गेली. राज्यात मराठा समाजाचे मोठे व दिग्गज नेते, राज्यकर्ते असूनही त्यांच्या खेकडा वृत्तीमुळे हा विषय निकाली निघाला नाही. आजवर शांततेच्या मार्गाने अधिकार व न्यायहक्कासाठी लढणारा हा समाज, प्रसंगी तितकाच आक्रमकही होवू शकतो. म्हणून या प्रश्नी राजकारण न करता राज्य सरकारने पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी केले. या वेळी शरद थोरात, खंडू सातपुते, अशोक सातपुते, राजू सातपुते आदींनी त्यांचे विचार व्यक्त केले.

सुमारे तासभर वाद्यांच्या गजरात चाललेल्या या ठिय्या आंदोलनाची सांगता निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम यांना मागण्यांचे निवेदन देवून करण्यात आली. या वेळी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज तसेच अमोल खताळ, अमोल कवडे, किरण घोटेकर, राजेंद्र देशमुख, नारायण खुळे, अविनाश थोरात. अण्णासाहेब काळे, नवनाथ अरगडे, सुधाकर गुंजाळ आदींसह शहर व तालुक्यातील सर्व मराठा संघटनांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement of Maratha community in tehsil office of Sangamner taluka