खासदार सुजय विखे पाटील इंदोरीकर महाराजांच्या भेटीला, काय म्हणाले...

आनंद गायकवाड
Sunday, 16 August 2020

मध्यंतरी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली होती.

संगमनेर ः अपत्यप्राप्तीबाबत सम-विषम तारखेचा फॉर्म्युला जाहीर कार्यक्रमात सांगितल्याने प्रसिध्द कीर्तनकार व समाजप्रबोधनकार निवृती महाराज देशमुख ( इंदोरीकर ) न्यायालयीन प्रक्रियेत गुरफटले आहेत.

या दरम्यान त्यांच्या निवासस्थानी अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. सोशल मीडियातूनही त्यांना सहानुभूती मिळते आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादीचे नेतेही महाराजांचे समर्थक आहेत. मागे एकदा नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाराजांबद्दल आदर व्यक्त केला होता. 
शनिवार ( ता. 15 ) रोजी भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अचानक भेट देवून त्यांच्याशी चर्चा केली. 

हेही वाचा - सावधान...कोरोनाची ही टेस्ट केली तर जिवानिशी जाल

मध्यंतरी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली होती. यावेळी महाराजांच्या बाबतीत राज्य सरकारने सहानुभूती दाखवायला हवी होती, असे सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली होती. काल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही पूर्ण गुप्तता पाळीत संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील निवासस्थानी भेट दिली. देशमुख परिवाराशी संवाद साधताना सुरु असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी रामनामाची शाल देवून महाराजांचा सत्कार केला. ही आपली केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगत खासदार विखे यांनी अधिक भाष्य केले नाही. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sujay Vikhe Patil met Indorikar Maharaj