esakal | शेतकऱ्यांसाठी परवड थांबली!.. जामखेडमध्ये "नाफेड'चे कांदा खरेदी केंद्र सुरू 

बोलून बातमी शोधा

NAFED launches onion shopping center in Jamkhed

तालुक्‍यातील कांदाउत्पादक शेतकऱ्यांची कांदाविक्रीसाठी सातत्याने होणारी परवड रोखण्यासाठी कांदाउत्पादक शेतकऱ्यांसाठी "नाफेड'मार्फत राज्यातील पहिले कांदा खरेदी केंद्र डोळेवाडी (ता. जामखेड) येथे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने काकासाहेब खाडे यांच्या "शेतकरी उत्पादक संस्थे'च्या माध्यमातून सुरू झाले आहे.

शेतकऱ्यांसाठी परवड थांबली!.. जामखेडमध्ये "नाफेड'चे कांदा खरेदी केंद्र सुरू 
sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : तालुक्‍यातील कांदाउत्पादक शेतकऱ्यांची कांदाविक्रीसाठी सातत्याने होणारी परवड रोखण्यासाठी कांदाउत्पादक शेतकऱ्यांसाठी "नाफेड'मार्फत राज्यातील पहिले कांदा खरेदी केंद्र डोळेवाडी (ता. जामखेड) येथे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने काकासाहेब खाडे यांच्या "शेतकरी उत्पादक संस्थे'च्या माध्यमातून सुरू झाले आहे. त्यामुळे कांदाउत्पादकांना कांदा विक्रीसाठी पुणे, मुंबई, सोलापूरला जाण्याची आवश्‍यकता राहिली नाही. हे केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैसा वाचेल. हे सुविधा केंद्र बळिराजाला "पर्वणी'च ठरेल, हे मात्र निश्‍चित! 

हेही वाचा नियोजन मंडळाचा निधी आमदारांना देणे चुकीचे, हर्षदा काकडे यांची टीका 

कर्जत-जामखेड अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणारे तालुके आहेत. येथे हंगामी शेती केली जाते, तसेच कमी कालावधीचे पीक घेण्याकडे येथील शेतकऱ्यांचा नेहमी "कल' राहतो. त्यात "कांदा' पिकाला येथील शेतकऱ्यांनी नेहमीच पसंती दर्शविली. मात्र, कांदा उत्पादनानंतर विक्रीची समस्या येथील शेतकऱ्यांना कायम आव्हानच राहिली. यातून ठोस मार्ग काढण्यासाठी येथील नेतृत्वाचे प्रयत्न नेहमीच "तोकडे' पडले. त्यामुळे येथे उत्पादित झालेला कांदा सोलापूर, बार्शी, नगर, पुणे, मुंबईकडे विक्रीकरिता पाठवावा लागायचा. यामध्ये शेतकऱ्यांना मोठे कष्ट सोसावे लागत होते. श्रम, वेळ आणि पैसा या तिन्हींचा भार शेतकऱ्यांच्या खांद्यावर यायचा. यातून मार्ग काढण्यासाठी आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेऊन  कांदाउत्पादकांकरिता कांदा खरेदी केंद्र सुरू केले. 
या संदर्भात अधिक माहिती अशी ः मागील आठवड्यात तालुक्‍यातील काही गावांना अवकाळी वादळी वाऱ्याचा फटका बसला. फळउत्पादक व शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी आमदार पवारांनी जामखेड तालुक्‍याचा दौरा केला होता. त्या वेळी "नाफेड'चे कांदा खरेदी केंद्र तालुक्‍यात सुरू करण्याची ग्वाही आमदार पवारांनी दिली होती. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अवघ्या आठच दिवसांत केली. 

हेही वाचा श्री विशाल गणेश अवतरणार भाविकांच्या घरी 

याकरिता आमदार रोहित पवारांनी नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक घेतली होती. या बैठकीसाठी "नाफेड' आणि "महा-एफपीसी' या नामांकित कंपन्यांचे प्रमुख अधिकारी, तसेच यापूर्वी जे कांदा खरेदी केंद्र होते त्यांचे अधिकारी, कर्जत-जामखेड दोन्ही तालुक्‍यांचे कृषी अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. या वेळी कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्‍यांत कांदा विक्री करण्यासाठी येथील शेतकरी इतरत्र जातो. मात्र, त्यांचे मोठे हाल होतात. यातून बाहेर पडण्यासाठी येथेच कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याच्या विषयावर चर्चा झाली आणि या संदर्भात अवघ्या काही दिवसांनी हे केंद्र सुरू करण्याची ग्वाही आमदार पवारांनी येथील शेतकऱ्यांना दिली होती. त्यानुसार मंगळवारी (ता. 19) राज्यातील पहिले कांदा खरेदी केंद्र आमदार पवारांनी डोळेवाडीला सुरू केले. 

हेही वाचा सकाळी सातला विवाह अन्‌ नऊला नवरी सासरी 

त्यामुळे तालुक्‍यातील कांदाउत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, यापुढील काळात शेतकऱ्यांना कांदाविक्रीसाठी पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कांदाविक्रीच्या समस्येवर मात करता येईल. भाववाढीनंतर कांद्याचे भाव संतुलित राहतील. कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे पाऊल टाकले असल्याचे सांगितले आहे. 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यापूर्वी कांदाउत्पादक शेतकऱ्यांची राहिलेली रक्कमही अदा केली जाणार आहे. शेतकऱ्यांकडे असणारा कांदा बांधावर खरेदी करून त्याची या भागातच साठवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कांदा बाजारपेठेत नेण्याच्या खर्चाबरोबरच बाजारपेठेतील इतर खर्चालाही आळा बसणार आहे. याकरिता शेतकऱ्यांच्याच कांदाचाळी भाडेतत्त्वावर संबंधित कंपन्यांकडून घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे याचाही शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे. "नाफेड' या कंपनीच्या मार्गदर्शनाखालीच ही कांदा खरेदी केंद्रे चालवली जाणार आहेत. कांद्याच्या पूर्ण उत्पादनापैकी काही टक्केवारी या केंद्राच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. 

हेही वाचा सभापतींचा विहिरीत पडल्याने मृत्यू 

मतदारसंघात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्याने येथील शेतकऱ्यांना बाजारभावाच्या अनियमिततेचा फटका सोसावा लागत होता, तसेच बाजारपेठ येथून तब्बल साडेतीनशे किलोमीटर अंतरावर असल्याने वाहतुकीसाठी अधिक पैसे मोजावे लागत होते. कांद्याचे बाजारभाव कोलमडल्यानंतर कधी कधी शेतकऱ्यांना वाहतुकीचे पैसेही मिळत नव्हते. शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे कांदा पीक हे जुगार म्हणूनच घेण्याचा शेतकऱ्यांचा कल निर्माण झाला होता. मात्र, "नाफेड'च्या खरेदी केंद्राने कांदाउत्पादकांना योग्य न्याय मिळणार आहे.