जैवऊर्जा निर्मितीबाबत नितीन गडकरी म्हणतात... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे "जैवऊर्जा- हवामान अद्ययावत नूतनीकरणक्षम ऊर्जा : सद्यःस्थिती आणि पुढील दिशा' या विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय वेबिनारमध्ये मंत्री गडकरी बोलत होते.

राहुरी विद्यापीठ : ""जैव इंधनासह बांबूसारख्या पिकांपासून तयार होणारी अगरबत्ती स्टिक, लोणचे, कपडे, पेपर मिलकरिता लागणारा पल्प, यांसारखे पदार्थ तयार करता येतील. अशा छोट्या उद्योगांतून रोजगाराची साधने निर्माण होतील. जैवऊर्जा निर्मितीतून ग्रामीण विकास शक्‍य आहे,'' असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

हेही वाचा ः नगरमध्ये कोरोनाने आवळला फास...पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पावणे पाचशेवर 

महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे "जैवऊर्जा- हवामान अद्ययावत नूतनीकरणक्षम ऊर्जा : सद्यःस्थिती आणि पुढील दिशा' या विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय वेबिनारमध्ये मंत्री गडकरी बोलत होते. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, डॉ. विलास भाले (अकोला), डॉ. अशोक ढवण (परभणी), अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. चिंतामणी देवकर, नियंत्रक विजय कोते उपस्थित होते. 

अवश्‍य वाचा ः डॉ. सुजय विखे पाटलांना पवारांवरील टीकेबाबत असं वाटतयं... 

मंत्री गडकरी म्हणाले, ""पंजाब, हरियानात भाताचे, तसेच उत्तर प्रदेशातून साखरेच्या जास्तीच्या उत्पादनाचे रूपांतर जैव इंधनात करणे गरजेचे आहे. हवाई, तसेच सागरी वाहतुकीसाठी लागणाऱ्या इंधनाची गरज जैव इंधनातून पूर्ण केली, तर जीवसृष्टी, तसेच पर्यावरणाचे संवर्धन होईल. वातावरणाचे प्रदूषण कमी होईल. शेतातील बायोमास, तसेच बांबूसारख्या हरितऊर्जेचे रूपांतर करून त्याचा उपयोग फर्निचरनिर्मिती, पेपर इंडस्ट्रीमध्ये केला, तर जंगलांचे संवर्धन होईल. पेपर पल्पच्या आयातीवरील आपला खर्च कमी होईल. यासाठी पीकपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. बांबूसारख्या पर्यावरणपूरक पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे लागेल.'' 

सूत्रसंचालन डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले. ऑनलाइन वेबिनारसाठी यू-ट्यूब, फेसबुक व सिस्को वेबेक्‍स ऍपच्या माध्यमातून देशभरातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी व शेतकरी उपस्थित होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkari says about bio-energy generation